मनोज म्हात्रेंच्या हत्येतील मुख्य सूत्रधार प्रशांत म्हात्रेसह चौदा जणांना अटक

0

भिवंडी : भिवंडी महापालिका सभागृहनेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी रात्री मुख्य सूत्रधारासह आणखीन पाच जणांना अटक केली आहे. हत्येचा सूत्रधार प्रशांत भास्कर म्हात्रे ,चिरंजीव उर्फ मोटू म्हात्रे यांना महाबळेश्वरच्या पाचगणी येथील भिलारे गावांतून अटक केली आहे. तर शशिकांत म्हात्रे ,कुणाल उर्फ नारल्या म्हात्रे व रजनी उर्फ रजनीकांत म्हात्रे या तिघांना खारबांवलगतच्या गावातून ताब्यात घेवून अटक केली आहे.या सर्वांना गुरुवारी ठाणे जिल्हासत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

१४ फेब्रुवारीच्या रात्री ओसवालवाडी येथे म्हात्रे यांची हत्या मारेकरी कुणाल उर्फ नारल्या याने बंदुकीतून गोळीबार तर रजनी उर्फ रजनीकांत याने कोयत्याने सपासप वार करून अमानुषपणे हत्या केली होती.समाजाला हादरवून सोडणाऱ्या या हत्येच्या तपासासाठी वरिष्ठ पातळीवरून नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे प्रमुख वपोनि.एन.टी.कदम,पोनि.आर.व्ही.कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने फरार आरोपींचा राजस्थान ,गुजरात ,दमण ,सेल्वासा ,रायगड ,सातारा ,कोकण परिसरात अगदी बारकाईने शोध घेवून यातील मारेकरी  गणेश पाटील ,बंबम उर्फ शंकर झा ,विष्णू उर्फ विश्वपाल पाटील,विद्देश पाटील ,महेश पंडित म्हात्रे ,मयूर उर्फ कोको म्हात्रे,अंगरक्षक जिग्नेश पटेल,रंगनाथ म्हात्रे आदींना हत्येच्या काही दिवसातच अटक केली आहे तर सुजित उर्फ बंड्या बळीराम म्हात्रे यास गुरुवारी अटक करून पोलीस कोठडीत डांबले आहे.मनोज म्हात्रे यांच्या हत्येतील आरोपींची संख्या आता १४ झाली असून मुख्यसूत्रधार प्रशांत म्हात्रे याचे वेहळे व खार्डी येथील दोन मेहुण्यांसह अद्यापी पाच ते सात आरोपी फरार असल्याने पोलीस पथकाकडून त्यांचा कसून शोध सुरु असल्याची माहिती तपास पथकाचे प्रमुख पोनि.एन.टी.कदम यांनी दिली आहे