मुंबई । मनोरा आमदार निवासातील घोटाळ्याप्रकरणी दोषी अधिकार्यांविरोधात गुन्हा दाखल होत नसल्याने भाजपचेच आमदार संतप्त झाले आहेत. भाजपचे भंडारा जिल्ह्यातील तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी हा घोटाळा समोर आणला होता. या घोटाळ्याची चौकशी होऊन अधिकार्यांना दोषीही ठरवण्यात आले. मात्र दोषी अधिकार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करूनही ती पूर्ण होत नसल्याने आता आमदारांनी थेट कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. आमदार निवासातील आमदारांच्या सदनिकेत काम न करताच बिले काढल्याचा घोटाळा भाजपाचे तुमसर येथील आमदार चरण वाघमारे यांनी समोर आणला होता. या प्रकरणात कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके, उप अभियंता बी. एस. फेगडे, शाखा अभियंता के. डी. धांडगे चौकशीत दोषी आढळून आले असून अद्याप कारवाई झालेली नसल्याने कोर्टात जाणार असल्याचे वाघमारे यांनी म्हटले आहे.
दोषी अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष
दोषी अधिकार्यांपैकी दोन अधिकार्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांची बदली करण्यात आली आहे. याप्रकरणी दोषी अधिकार्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार चरण वाघमारे यांनी महिनाभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील आणि या विभागाच्या प्रधान सचिवांना केली होती. मात्र अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने आमदार वाघमारे संतप्त झाले असून आता ते न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत.
13 लाख रुपये लाटण्याल्याचा आरोप
आमदार वाघमारे यांच्या सदनिकेत दुरुस्ती आणि इतर कामे केल्याचे कागदोपत्री दाखवून 13 लाख रुपये लाटण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष ही कामे झाली नव्हती. वाघमारे यांनी या प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर आणखी 31 आमदारांच्या सदनिकांमध्ये हाच घोटाळा झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर या घोटाळ्याची चौकशी झाली. चौकशीअंती समोर आलेला अहवाल धक्कादायक असून त्यामध्ये आमदारांच्या सदनिकांमध्ये कामे न करताच त्याची बिले अदा करण्यात आली असल्याचे निश्चित झाले आहे. तपासणी केलेल्या 8 सदनिकांपैकी 7 सदानिकांमध्ये निविदेनुसार कामे झाली नसल्याचे आढळले आहे. कामे केल्याच्या नोंदींमध्ये चुकीच्या नोंदी असून प्राथमिक चौकशीत अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
मनोरा आमदार निवास धोकादायक असल्याचे दाखवून लाखो रुपयांची बोगस कामे पीडब्लूडीच्या अधिकार्यांनी केली आहेत. त्यामुळे या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट व्हावे आणि सर्व कामांची तपासणी व्हावी. या प्रकरणात दोष सिद्ध होऊनही कारवाई होत नसल्याने कोर्टात जाण्याची तयारी केली आहे.
-आमदार चरण वाघमारे