मनोरा आमदार निवासाला हागणदारी मुक्त करण्याची मागणी!

0

मुंबई:- शासनाकडून राज्यभरात हागणदारीमुक्तीसाठी आटोकाट प्रयत्न केले जात असताना आता मुंबईत खुद्द लोकप्रतिनिधी निवास करत असलेल्या मनोरा आमदार निवासाला हागणदारीमुक्त करण्याची मागणी आज, 1 एप्रिल रोजी सभागृहात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांनी मनोरा आमदार निवासात पाण्याच्या समस्येच्या संदर्भात बोलताना मनोरा आमदार निवासाला हागणदारीमुक्त करण्याची मागणी केली.

राज्यभरात उन्हाळ्याचा चटका लागत असताना पाण्याची समस्येची झळ मनोरा आमदार निवासाला देखील लागली असल्याने शनिवारी विधेयकावर चर्चा सुरु असताना नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांनी आमदार निवासातील दूषित पाण्याचा मुद्दा विधानसभेत ठेवला. दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी आल्याने पवित्र अशा सभागृहात बिना आंघोळीचे यावे लागत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

यावेळी बोलताना त्यांनी मनोरा आमदार निवासाला हागणदारीमुक्त करण्याची मागणी देखील केली. यावेळी ते म्हणाले की, आम्ही सी-फेस पाहता यावा यासाठी मनोऱ्यातील खोल्या घेतल्या मात्र मरीनड्राईव्हकडील झोपडपट्टीतील लोकं मनोऱ्याकडे पार्श्वभाग करून शौचाला बसलेले दृश्य आम्हा आमदारांना रोज पाहावे लागते. या समस्येकडे गांभीर्याने दखल घेत मनोऱ्याला हागणदारीमुक्त करा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी सभागृहात प्रचंड हशा पिकला. यावेळी अध्यक्षांनी मिश्कीलपणे तुम्ही तिकडे पाहत जाऊ नका सांगत पाण्यासंदर्भात व्यवस्था केली असल्याचे सांगत हागणदारी संदर्भात सभापतींच्या दालनात बैठक लावली असून प्रश्न सुटेल असे आश्वासन दिले.