मुंबई : असुविधांनी ग्रस्त मनोरा आमदार निवास आज, सोमवारी पुन्हा प्रकाशझोतात आले. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या डी विंग मधील 125 नंबरच्या खोलीतील छत कोसळल्याने विधानसभेत सर्वपक्षीय आमदारांनी निवासाची पर्यायी व्यवस्था करण्याबाबत आक्रोश व्यक्त केला. आमदार पाटील यांच्या खोलीतील तुटलेल्या सिलिंगचा मोठा तुकडा सभागृहात दाखवत राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी जर ते खोलीत असते तर आज त्यांना श्रद्धांजली वाहावी लागली असती असे सांगत आजच्या आज आमदारांची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली. पवार यांनी मुद्दा उपस्थित करताच सत्ताधारी भाजपसह सर्वपक्षीय सदस्य या मागणीसाठी एकवटले. मुख्यमंत्र्यांनी आजच्या आज बैठक घेऊन तात्काळ निवासाची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर हा गोंधळ थांबला.
तोवर आमदारांना एक लाख महिना द्या
ही घटना गंभीर असून सर्वच आमदारांना लवकर शिफ्ट करा असे सांगत अजित पवार यांनी टेंडर वेळ न घालवता तातडीची गरज म्हणून ही गरज पूर्ण करा असे सांगितले. पर्यायी व्यवस्था झाली तर ठीक नाहीतर जोवर व्यवस्था नाही होत तोवर सदस्यांना महिन्याकाठी 1 लाख रुपये देण्याची त्यांनी केली. यावेळी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदारांच्या जीवावर बेतलेल्या या घटनेचे गाम्भीर्य ओळखून आजच्या आज जाहिरात देण्याची मागणी केली. तसेच आजच्या आज मनोरा खाली करण्याची मागणी देखील त्यांनी केली.
सभागृहात सतरंजी टाकून झोपू द्या
आम्हीच जिवंत नाही राहिलो तर काय चर्चा करणार? असे सांगत डॉ. सतीश पाटील यांनी मनोऱ्यावर प्रत्येक अधिवेशनात चर्चा होतेय, मात्र व्यवस्था होत नाही. आम्हाला सभागृहातच सतरंजी टाकून झोपू द्या, अशी संतप्त मागणी त्यांनी केली.
मंत्रालयापासून जवळच व्यवस्था करा
दरम्यान या मुद्द्यावर बोलताना मनोऱ्यातील 158 आमदारांची पर्यायी व्यवस्था करणे सुरू असल्याचे गिरीश बापट यांनी सांगितले. 250 फ्लॅट पीडब्लूडीचे उपलब्ध आहेत तसेच मंत्रालय परिसरात देखील टॉवर घेऊ असे त्यांनी संगितले. याबाबत टेंडर नोटीस उद्या काढली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान राहण्याची व्यवस्था विधानभवनापासून जवळच करावी असे शंभूराजे पाटील यांनी सांगितले. त्यावर अध्यक्षांनी तुम्हाला लांब पाठविले जाणार नाही असे सांगत त्यांना खाली बसविले.
आजच निर्णय घेणार: मुख्यमंत्री
दरम्यान गोंधळ वाढत चालल्याचे पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन आमदार निवास बांधण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत आज बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे सांगितले. पवार म्हणाले त्याप्रमाणे 1 लाख रुपये देऊन किंवा अन्य आणखी पर्याय तपासून हा निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. मी आमदार असताना मॅजेस्टिकला माझ्यासोबतही असा प्रकार घडला होता, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मनोऱ्याचे बांधकामच फॉल्टी असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.