दोन तास ओएचईच्या पोलवर चढून बसला प्रवासी
भुसावळ – रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी गाडीतून खाली उतरविल्याचा राग आल्याने संतापलेल्या प्रवाशाने थेट येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म चार वर येणार्या रेल्वे मार्गावरील ओव्हर हेड वायरींगच्या (ओएचई) पोलवर चढला. पोलवरून प्रवासी खाली उतरण्याचे नाव घेत नव्हता,पोलिस,आरपीएफ व अन्य अधिकार्यांनी त्यांची मनधरणी केली मात्र तो खाली उतरला नाही, त्यामुळे त्याला खाली उतरविण्यासाठी पालिकेच्या फायर ब्रिगेडच्या कर्मचार्यांना पाचारण करण्यात आले होते, तब्बल दोन तासांनी ओएचईच्या खांबावरून खाली उतरविण्यात पोलिस प्रशासनाला यश आले. ही घटना बुधवारी सकाळी 10.30 ते 12.30 च्या दरम्यान घडली. संबंधित प्रवासी हा मनोरूग्ण असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
येथील रेल्वे स्थानकावर परितोष दास (वय 50, रा. दिनाजपूर, पश्चिम बंगाल) हा पोलवर चढला होता, त्याला खाली उतरविण्यासाठी जीआरपी पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गढरी व त्यांचे सहकारी तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे जवान यांनी त्यास समज देत खाली येण्यास सांगितले. मात्र परितोष दास कोणाचेही ऐकत नव्हता, त्यास खाली कसे उतरविता येईले यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू होते. पोलवर चढण्याचे नेमके कारण काय हे मात्र कळू शकत नव्हते. शोले सिनेमा स्टाइल प्रमाणे दास यांने ओएचइॅ पोलवर चढत संपूणॅ रेल्वे प्रशासनाला हैराण केले होते. तब्बल दोन तास तो ओएचईच्या खांबावर बसून होता. जीआरपी पोलिसांकडून पालिकेच्या अग्निशमन विभागाला फोनवरून रेल्वे स्थानकावर बोलावून घेतले. यावेळी फायरची गाडी व कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे लाईनीत पोलच्या जवळ अग्निशमन केद्राची गाडी नेली. यावेळी जीआरपी पोलिस व फायरचे कर्मचारी यांनी तातडीने गाडीवरील मोठी शिडी लावून कर्मचार्यांपर्यत पोचले व त्यांनी दास यास ताब्यात घेतले. चार ते पाच जणांनी मिळून त्यास पोलवरून खाली उतरविले आणि तातडीने पालिका दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. तेथे त्याच्यावर प्राथमीक उपचार करून जिल्हा रूग्णालयात पुढील उपचारार्थ हलविण्यात आले. दास याला कुठेही जखम झाली नव्हती, तो बेशुध्द होता. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी दास याला खाली उतरविण्यात यश आले, दास मनोरूग्ण असावा असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला.