ठाणे । मनोरूग्णालयाच्या जागेवर नव्याने उभारण्यात येणार्या विस्तारीत ठाणे रेल्वे स्टेशनसाठी जागा हस्तातंरणासाठी ठाणे महानगरपालिकेने आरोग्य विभागाला जागेच्या मोबदल्याचे तीन पर्याय दिले आहेत. यासंदर्भात महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तशा आशयाचे पत्र राज्य शासनाच्या आरोग्य विभागाला पाठविले आहे. ठाणे व मुलुंड या रेल्वे स्थानकाच्या दरम्यान मनोरूग्णालयाच्या जागेवर नवीन विस्तारीत रेल्वे स्थानक प्रस्तावित करण्यात आले आहे. सदर प्रकल्पाला रेल्वे प्रशासनाने तांत्रिक मान्यताही दिलेली आहे. यासंदर्भात राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री दिपक सावंत, खासदार, महापालिका आयुक्त आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या बैठकीमध्ये मनोरूग्णालयाची जागा हस्तांतरित करण्याबाबत चर्चाही झाली होती.
हस्तांतरणाची रितसर कारवाई
चर्चेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सदर जागेच्या मोबदल्याबाबत तीन पर्याय दिले आहेत. यामध्ये महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार एकूण आरक्षित क्षेत्र ठाणे महापालिकेच्या ताब्यात दिल्यास त्या क्षेत्राच्या दुप्पट क्षेत्र इतके विकास हक्क हस्तातंरण प्रमाणपत्र देय इन्सेटींव्हसह देणे.
तसेच आरक्षित क्षेत्रामधील झोपड्यांच्या पुनर्वसन महापालिकेच्यावतीने करणे, आरक्षित भुखंडापैकी अतिक्रमित भुखंड व सर्वसाधारणपणे रेल्वे हद्दीपासून 30 मीटर अतरात बांधकाम करता येत नसल्यानेते क्षेत्र वगळून उर्वरित अनुज्ञेय बांधकाम क्षेत्राएवढे क्षेत्रफळ आरोग्य विभागास बांधीव स्वरूपात ठाणे शहरामध्ये अन्यत्र बांधकाम करून हस्तांतरीत करणे आणि ठाणे महापालिका हद्दीत अन्य सोयीस्कर जागी नव्याने आरोग्य विभागासाठी 14.83 एकर भुखंड आरक्षित करून सदर जागा टीडीआर देवून खाजगी व्यक्तीकडून संपादित करून हस्तांतरित करणे आदी तीन पर्यायांचा समावेश आहे. सदरपैकी कोणताही पर्याय महापालिकेस प्राप्त झाल्यास जागेच्या हस्तांतरणाची रितसर कार्यवाही महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे.