Bicycles and two-wheelers were burnt near Sakari Phata in Bhusawal भुसावळ : मध्यरात्रीच्या सुमारास ज्वलनशील पदार्थांद्वारे वाहने पेटवण्याच्या प्रमाणात शहरात वाढ झाली आहे. शहरातील साकरी फाटा भागातही गुरुवारी पहाटेच्या सुमारास वाहनांना आग लावण्यात आल्याची बाब उघड झाल्याने वाहनधारकांमध्ये भीती पसरली आहे. विकृत प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्यात पोलिस प्रशासनाला सपशेल अपयश आले असून सातत्याने घडणार्या घटना पाहता पोलिस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मध्यरात्री पेटवली वाहने
शहरातील कंडारी शिवारातील साकरी फाटा येथील आवटे नगरातील रहिवासी संतोष सुंदरलाल पाशीकर हे मिल्ट्री कॅम्पमध्ये नोकरीला आहेत. घराबाहेर त्यांनी दुचाकी, दोन सायकली व एक कुलर ठेवले होते मात्र बुधवारी रात्री 12 वाजेनंतर अज्ञात समाज कंटकाने या वाहनांसह सायकलीला पेटवून दिल्याची बाब गुरुवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. गुरुवारी पहाटे पाच वाजता काशीकर यांची पत्नी बाहेर अंगण झाडण्यासाठी आल्यानंतर त्यांना घडलेला प्रकार निदर्शनास आला. आगीत दुचाकी, तीन सायकल व एक कुलर जळाल्याने सुमारे दिड लाखांचे नुकसान झाले.
विकृताची चप्पल आढळली
काशीकर यांच्या जाळलेल्या वस्तूच्या जवळच एका बाजूला माचिस तसेच एक चप्पल सुध्दा पडलेली आढळली. काशीकर यांनी आलेल्या बाजारपेठ पोलिसांना तेथे पडलेल्या वस्तू दाखविल्यात. कुणीतरी माथेफिरूने मुद्दाम हा प्रकार केल्याचा पोलिसांना संशय आहे. बाजारपेठ निरीक्षक राहुल गायकवाड व सहकार्यांनी पाहणी केली. काशीकर यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सुमारे 31 हजार रुपये किंमतीचे साहित्य जळाल्याची नोंद पोलिसांनी केली.
एकाच महिन्यात घडल्या चार घटना
शहरातील जळगाव रोडवरील श्रीनगर, खडका रोडवरील महालक्ष्मी नगर, वांजोळा रोडवरील दत्त नगर या भागात टु व्हिलर गाड्या अज्ञात विकृतांनी जाळल्या होत्या. या घटना ताज्या असतांनाच साकरी फाट्यावरदेखील सायकल व दुचाकी जाळण्यात आल्याने वाहनधारकांच्या गोटात भीती पसरली आहे. पोलिसांनी घटनेच्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपासणी सुरू केली असून रात्र गस्त वाढवण्याची अपेक्षा व्यक्त हेात आहे.