‘मन की बात’द्वारे मोदींकडून पुण्यातील वेदांगी कुलकर्णीचे कौतुक !

0

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज यावर्षातील शेवटची ‘मन की बात’द्वारे देशवासियांना संबोधित केले. सुरुवातीला त्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मोदींची ही ५१ वी ‘मन की बात’ होती. आजच्या ‘मन की बात’चे विशेष म्हणजे, मोदींनी या कार्यक्रमात पुण्यातील वेदांगी कुलकर्णीचे कौतुक केले. वेदांगीने सायकलवरून जगाची फेरी पूर्ण केली. ती सर्वात लवकर जगाची फेरी पूर्ण करणारी आशियन बनल्याचे मोदींनी सांगितले.

२०१८ मध्ये जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना ‘आयुष्मान भारत’ची सुरुवात झाली. देशाच्या प्रत्येक गावापर्यंत वीज पोहोचली. विशेष म्हणजे जगाला आपली ताकद दिसून आली. भारत विक्रमी गतीने देशातील नागरिकांना गरिबीपासून मुक्त करत आहे, असे मोदी म्हणाले. जगातील अनेक संस्थांनी भारताचे सामर्थ्य मान्य केल्याचेही मोदी म्हणाले.

यंदाच्या वर्षातच भारताला संयुक्त राष्ट्राकडून पर्यावरणाबाबत सर्वोच्च पुरस्कार मिळाला. तसेच, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या उभारण्यात आलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचीही जगभरात चर्चा झाली.

अंडर-19 क्रिकेट विश्व चषक आणि ब्‍लाइंड क्रिकेट विश्व चषकात भारताने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आशियन खेळांतही भारताने मोठ्या संख्येने पदके जिंकल्याची आठवण मोदींनी सांगितली.