मन की बात: मोदींकडून पुन्हा स्वदेशचा नारा !

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’च्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला देशवासीयांशी संवाद साधत असतात. आज रविवारी त्यांनी ‘मन की बात’मधून पुन्हा जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा स्वदेशीचा नारा दिला. यासाठी त्यांनी देशवासियांना विचारले की, २०२२ सालापर्यंत स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनामित्त आपण हा संकल्प करु शकतो का? की, या दोन-तीन वर्षात मी स्थानिक उत्पादने खरेदीसाठीच आग्रही राहणार. भारतात तयार झालेल्या ज्यांमध्ये आपल्या देशवासियांच्या घामाचा गंध असेल अशा वस्तू खरेदी करण्याचा आपण आग्रह करु शकतो का? असे प्रश्न करून देशातील जनतेला स्वदेशसाठी साद घातली.

तरुणाईला घराणेशाही, जातीवादाची चीड

आपल्या देशातील तरुणांना योग्य व्यवस्थाच आवडते. या तरुणांना देशातील अराजकतेच्या परिस्थितीची चीड आहे. जातीवाद, घराणेशाहीची आजच्या तरुणाईला प्रचंड चीड असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

तारुण्याची किंमत ठरवली जाऊ शकत नाही. हा जीवनातला सर्वात मौल्यवान कालखंड असतो. या काळात तुम्ही तुमचे आयुष्य कसे जगता त्यावरच तुमचा भविष्यकाळ अवलंबून असतो. त्यामुळे कॉलेजमधल्या स्नेहसंमेलांसारख्या उपक्रमातूनही तुम्ही समाजासाठी मोठे काम करु शकता, असे स्वामी विवेकानंद यांनी सांगितले असल्याची आठवण मोदींनी करून दिली.