तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी भाजपला निवडणुकांच्या माध्यमातून निरोप देण्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र येण्याचे आव्हान केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये प्रखर हिंदुत्ववादी आदित्यनाथ योगींना राज्याचे स्वामी केल्यानंतर बिहारमध्येही नितीश कुमार यांच्या सहकार्याने भाजपने सत्ता काबीज केली. उत्तरेतील राज्यांमध्ये आपला राजकीय प्रभाव कायम ठेवत असताना लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग यादव यांना निष्प्रभ करण्यावर त्यांचा भर आहे. ममता बॅनर्जी यांनाही भाजपने अडचणीत आणण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पश्चिम बंगालमधील कम्युनिस्टांची प्रदीर्घ राजवट उलथवणार्या ममतादीदींनी भाजपशी कडवी झुंज देण्याचा निर्धार केला आहे.
ममतादीदींनी बंगालमधील कम्युनिस्टांची सद्दी संपवली ती प्रचाराच्या झंझावातानेच. भारतीय जनता पक्षाचा विजयी अश्व चौफेर कामगिरी करीत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सुशासन, भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न दाखवत अच्छे दिन येतीलच, असे नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला अभिवचन दिले. मोदींची प्रचार तंत्रे विलक्षण होती. गुजरातमध्ये मोदींचे व्यक्तिमत्त्व हिंदुत्ववादी त्यांनी आर्थिक सुबत्ता हा प्रचाराचा केंद्रबिंदू ठेवला. हिंदुत्व प्रचारात दिसलेच नाही. सत्तेसाठी प्रचारावर भावनिकतेचा प्रभाव ठेवणे हे सूत्र भाजप आजही अवलंबत आहे. या तंत्राची किती काळ चलती राहील यावर 2019 च्या लोकसभा निवडणुकांमधील यश ठरणार आहे. याशिवाय विरोधकांना गाफील ठेवून नवेच प्रचारतंत्र व प्रचाराचा मुद्दा भाजप देशवासीयांसमोर आणू शकतो. त्यामुळे काँग्रेस, कम्युनिस्टांसहित जनता दल, तृणमूल काँग्रेस आदींसाठी लोकसभा निवडणूक निकालांपर्यंत रात्र वैर्याची आहे. तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी यांनी विरोधकांना एकत्र येण्याचे आव्हान कालच केले आहे. त्यांनी 2019 मधील लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपशी कडवा संघर्ष करण्यासाठी काँग्रेस आणि कम्युनिस्ट या पारंपरिक शत्रूंसोबत काम करण्याचीही तयारी दाखवली आहे. राजकीय परिस्थितीप्रमाणे राजकीय नेत्यांची धोरणे बदलत असतात. समाजवादी नितीश कुमार भाजपसोबत जाऊ शकतात किंवा भाजप काश्मीरमध्ये पीडीपीसोबत सत्तेस सहभागी होऊ शकते. फ्रान्सिस फुकुयामा या विचारवंताने 1990च्या दशकानंतरच्या युगात विचारप्रणालींचा अंत, हा सिद्धांत मांडला होता. त्याची पडताळणी आंतररारष्ट्रीय स्तरावरील आर्थिक सहकार्यांच्या निकषांवर वाढणार्या युरोपियन युनियन, ब्रिक्स, जी 20 आदी संघटनांच्या अभ्यासातून करता येते. याशिवाय तत्त्वनिष्ठांशी सोयरसुतक असलेल्या देशांतर्गत राजवटी आणि नेते आता कमी झाले आहेत. भारतात तत्त्वांशी काडीमोड घेऊन भाजपशी सोयरीक न करू शकणारे काही पक्ष अजूनही जागृत आहेत. त्यांचाच आधार ममतादीदींना 2019 मधील निवडणुकीसाठी वाटत आहे. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर समविचारी संघविचारसरणी न पटणारे पक्ष एकत्र आले, तर केंद्रातून भाजपला निरोप देणे कठीण नाही. निरोप द्या, पण उच्चाटन करू नका.
भाजपच्या काँग्रेसमुक्त भारत घोषणेची आठवण यानिमित्ताने येते. भाजपला राजकीय पंडितांनी दाखवून दिले की, लोकशाहीतील एखाद्या पक्षाचे समूळ उच्चाटन करणे ही हिटलर, मुसोलिनीची नीती आहे. निवडणुका यासाठी असतात की फॅसिझम व नाझीवादाच्या मार्गाने सत्ताबदल होऊ नये. कदाचित हे पटल्यामुळे अमित शहा आणि त्यांच्या वर्तुळातील नेते आता काँग्रेसमुक्तीची भाषा करीत नाहीत. फक्त भाजपा उन्नतीची भाषा करतात. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला मानसिकतेत बदल करून प्रादेशिक पक्षांना प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. दिल्लीत राहून काँग्रेसने सहकारी प्रादेशिक पक्षांना मदत करावी आणि जेथे काँग्रेस प्रबळ आहे तेथे हे पक्ष काँग्रेसला मदत करतील, असा हा ममता फॉर्म्युला आहे. पश्चिम बंगालपुरते कम्युनिस्टांना मात्र वेगळेच सांगायचे आहे. चौथ्या क्रमांकावर असणार्या भाजपसाठी काँग्रेस, तृणमूल काँगे्रस आणि कम्युनिस्टांनी एकत्र येण्याची गरज काय, असा त्यांचा तर्क आहे.
कम्युनिस्टांची भगव्या विचारसरणीला रोखण्याची पद्धत वेगळी आहे. संघ परिवार प्रथम बिगर भाजपा राज्यांमध्ये सांस्कृतिक काम सुरू करतो. धार्मिक सण मिरवणुका व कार्यक्रम साजरे केले जातात. लोकांना धर्माच्या नावावर एकत्रित केले जाते नंतर भाजपचा उमेदवार त्या ठिकाणी उभा केला जातो. पश्चिम बंगाल आणि केरळमधील संघाच्या चंचुप्रवेशाची गणिते कम्युनिस्टांना माहीत आहेत. भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला रोखले पाहिजे हे त्यांना पक्के माहीत आहे. त्यांच्याप्रमाणे ममतादीदींकडे संघाला रोखण्यासाठी नेटवर्क नाही. उलट बंगालमध्ये भाजप वाढण्यास ममतादीदीच कारणीभूत आहेत असे कम्युनिस्टांना वाटत आहे. भाजपनेही बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाला रोखण्यासाठी आक्रमक पावले उचलली आहे. त्यामुळेच त्यांनी राज्याच्या गुरखालँड सारख्या भागात तृणमुल काँग्रेसला अडचणीत आणणार्या भाषिक लढयात दूरून मजा बघणे पसंद केले. त्याठिकाणी असलेल्या मित्र पक्षाच्या हिंसक कारवाईंकडे राज्याचा प्रश्न आहे म्हणून सोयीस्कर दुर्लक्ष केले. त्यामळे येनकेन प्रकारे बंगालमध्ये बस्तान बसविण्यासाठी भाजप हरऐक प्रयत्न करत आहे. ममतादीदींच्या आव्हानाला कम्युनिस्ट प्रतिसाद देतील हे कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिटब्युरोमधील नेत्यांच्या वक्तव्यांवरून शंकास्पद वाटते. बंगालमधील काँग्रेस कार्यकर्त्यांना तृणमूल काँग्रेससोबत ममत्व वाटणे काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांवरून कठिण दिसत आहे. ममता बॅनर्जी यांनी देशभरातील शरद पवार, मायावती, अखिलेश यादव, शरद पवार आदी नेत्यांच्या पक्षांची मोट बांधण्याचा संकल्प करताच कम्युनिस्टांची माशी शिंकली. आघाड्यांमध्ये अंतर्गत पक्षीय अहंकार बाजूला ठेवणे भाजपला निरोप देण्याची भाषा करण्याएवढे सोपे नाही, हेच याघडीला स्पष्ट दिसत आहे.