मुंबई। दोन हजार कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने फरार घोषित केले आहे. यापूर्वीच या प्रकरणात न्यायालयाने तिच्या विरुद्ध अटक वॉरंट बजावले होते, मात्र त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ठाणे क्राईम ब्रांचने अखेर शुक्रवारी ममताला फरार घोषित केले. तसेच मुंबईतील यारी रोड या भागात तिच्या घरावर नोटीसही चिटकवली आहे.
30 दिवसांत हजर राहण्याचे आदेश
ममता कुलकर्णीला कोर्टासमोर हजर होण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे, त्या कालावधीत ममता हजर राहिली नाही तर तिची संपत्ती जप्त केली जाऊ शकते आणि तिच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही बजावली जाऊ शकते. दोन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात ममता कुलकर्णीसह विकी गोस्वामीही फरार आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी
एप्रिल आणि मे महिन्यात ठाणे पोलिसांनी 2000 कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामी या दोघांचे नाव समोर आले होते. विकी गोस्वामी सध्या केनियामध्ये आहे. कल्याणमध्ये 12 एप्रिल रोजी पहिल्यांदा एका नायजेरियन ड्रग डिलरला अटक करण्यात आली होती. नायजेरियन डिलरच्या माहितीनुसार, ठाण्यातून 2 तरुणांना अटक करण्यात आली. या दोन्ही तरुणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुण्यातून मयूर स्वामी नावाच्या फॅक्टरी मॅनेजरच्या मुसक्या आवळल्या. या सगळ्यांच्या माहितीनंतर सोलापूरच्या एव्हॉन लाईफ सायन्स ऑरगॅनिक कंपनीवर छापा मारण्यात आला. या कंपनीतून 2000 कोटी रुपये किंमतीचे एफिड्रिन ड्रग्ज सापडले. या रॅकेटमध्ये आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. अजूनही अनेक आरोपी फरार असून याचा मास्टरमाईंड ममता कुलकर्णीचा पती आणि आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट किंग विकी गोस्वामी आहे. आता ममता कुलकर्णीविरोधातही पोलिसांना महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत.