ठाणे : तब्बल २ हजार कोटीच्या एफेड्रीन प्रकरणी ठाणे पोलिसांना ठाणे न्यायालयाने अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि ड्रॅग तस्कर विक्की गोस्वामी यांच्या विरोधात नॉनबेलेबल वॉरंट मिळाले असून आता ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच.एम. पटवर्धन यांनी ठाणे पोलिसांच्या मागणीनुसार नॉनबेलेबल वॉरंट मुळे अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि विक्की गोस्वामी यांच्या गळ्याभोवती एफेड्रीन प्रकरणी फास आवळत चालला आहे. भविष्यात त्यांच्या बेनामी टाच येण्याचे संकेत ठाणे पोलिसांनी दिले आहेत.
१४ एपिल २०१६ रोजी सोलापूरच्या एव्हॉन कंपनीवर पोलिसांनी छापा मारून २ हजार कोटींचा एफेड्रीनचा कच्चा माल पोलिसांनी हस्तगत केला. एफेड्रीन प्रकरणात ठाणे पोलिसांनी आतापर्यंत १५ आरोपीना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणात ५ आरोपी अद्याप फरारी आहेत. यात ममता कुलकर्णी , विक्की गोस्वामी आणि केनिया मधील डॉ अब्दुल्ला आणि त्याचे दोन साथीदार असून ठाणे न्यायालयाचे न्यायमूर्ती पटवर्धन यांनी पाच फरारी आरोपी पैकी अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि विक्की गोस्वामी यांच्या विरोधात वॉरंट जरी केले आहे. कायदेशीर प्रक्रियेतील हे पहिले पाऊल असून भविष्यात त्यांच्या मालमत्ता सील करण्याची कारवाईचे संकेत ही ठाणे पोलिसांनी दिले आहेत. एफेड्रीन प्रकरणाचे धागेदोरे देशासोबतच विदेशात ही धागेदोरे तपासा दरम्यान निष्पन्न झाले आहेत. गुजरात राज्यातील एफेड्रीन साठा यातील एक भाग आहे. एफेड्रीन तस्करी भारतासोबतच केनिया देशात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ठाणे पोलिसांनी चार पथके तयार करीत ममता कुलकर्णी आणि विक्की गोस्वामी यांचा शोध सुरु केला असून त्यांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी पोलीस छापेमारी करीत आहे. तर त्यांचे नातेवाईक आणि भाऊ-बहीण यांच्या कडेही त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अमोल वायझाडे यांनी दिली. भविष्यात न्यायालयाच्या आदेशाने त्यांना फरारी घोषित केल्यास मात्र त्यांच्या नावे असलेल्या आणि बेनामी संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत ठाणे पोलिसांनी दिले आहेत. चार पथकाच्या माध्यमातून विविध ठिकाणी छापेमारी करीत ममता आणि गोस्वामी यांचा शोध सुरु आहे. जर त्यांनी बनावट दस्ताद्वारे देशाबाहेर पलायन केले असेल तर त्याबाबत माहिती मिळताच त्यांचा शोध ही विदेशात घेण्यात येणार आहे.