कोलकाता: आज बंगाल मधील पुरुलियाच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ममता दीदींनी माझ्या कानाखाली जरी मारली तरी तो माझ्यासाठी मोठा आशीर्वाद असेल, असे मोदी आज म्हणाले. पंतप्रधान म्हणाले कि ‘मला सांगितले गेले की ममता दीदींना मोदींच्या कानाखाली मारायची आहे. ममता दीदी, मी तर तुम्हाला दीदी म्हणतो. तुमचा आदर करतो. तुम्ही मुस्कटात जरी मारली तरी तो माझ्यासाठी मोठा आशीर्वाद असेल. तुमच्यासाठी मी तेही सहन करीन,’ असे म्हणत मोदींनी ममतांवर प्रतिहल्ला केला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ममतांनी एका प्रचार सभेत नरेंद्र मोदींवर टीका केली होती. ‘मोदींनी पाच वर्षांत ‘अच्छे दिन” आणण्याच्या गोष्टी केल्या होत्या. परंतु, नंतर मोदी यांनी नोटाबंदी केली, ते राज्यघटनासुद्धा बदलणार आहेत. मोदीच्या घोषणांवर माझा तिळमात्र विश्वास नाही. पैसा माझ्यासाठी सर्व काही नाही. मात्र, मोदी जेव्हा पश्चिम बंगालमध्ये येतात आणि तृणमूल काँग्रेस लुटारूंचा पक्ष असल्याचा आरोप करतात तेव्हा संताप होतो. यंदाच्या निवडणुकीत लोकशाहीमध्ये अर्थातच मतदारांकडून त्यांना सणसणीत मुस्कटात बसली पाहिजे,’ असे ममता म्हणाल्या होत्या. ‘भाजप पराभूत झाला तर खुद्द मोदींनाच चपराक बसल्यासारखे होईल,’ असेही त्या म्हणाल्या.