कोलकाता । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा शिरच्छेद करणार्यास 11 लाख रुपयांचे इनाम देण्यात येईल, असा धमकीवजा इशारा देण्यात आला आहे. भाजपच्या युवा मोर्चाच्या योगेश वार्ष्णेय या पदाधिकार्याने हे खळबळजनक विधान केले आहे. पश्चिम बंगालमध्ये हनुमान जयंतीनिमित्त रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यावरून नाराज झालेल्या युवा मोर्चाच्या नेत्याने हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दरम्यान, वार्ष्णेय याच्या विधानाचे संसदेतही पडसाद उमटले, तर तृणमूल काँग्रेसच्या तक्रारीवरून वार्ष्णेय यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे अलिगढचे पोलीस अधिकारी राजेश कुमार पांडे यांनी सांगितले.
योगेश वार्ष्णेय हे भारतीय जनता युवा मोर्चाचे उत्तर प्रदेशमधील नेते आहेत. ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना त्याचा तोल गेला आणि त्यांनी वादग्रत विधान केले. ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, बॅनर्जींनी कधीच सरस्वती पूजा, रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या यात्रांना परवानगी दिली नाही. याऊलट इफ्तार पार्टीचे आयोजन करतात आणि नेहमी मुस्लिमांना पाठिंबा देतात. सुरी पोलिसांनी हनुमान जयंतीनिमित्त यात्रा काढणार्या संस्थेला परवानगी नाकारली होती तसेच हनुमान जयंतीला यात्रेदरम्यान पोलिसांनी लाठीमारही केला. बॅनर्जी या हिंदूंच्या सणाला विरोध करतात. त्यामुळे त्यांचा शिरच्छेद करणार्याला मी 11 लाखांचे बक्षीस देईन, असे वक्तव्य वर्ष्णोय यांनी केले. पश्चिम बंगालमध्ये हनुमान जयंतीवरून वाद निर्माण झाला होता.
2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. त्यानंतर विविध राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला मोठे यश मिळाले. नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभेतही भाजपचा बहुमताचा झेंडा फडकला. त्यामुळे भाजपच्या वाचाळवीर नेत्यांच्या शिडात सत्तेची हवा शिरली असून, त्यांनी एकापाठोपाठ एक अशी वादग्रस्त वक्तव्ये करण्याचा सपाटाच लावला आहे. उत्तर प्रदेशातील राम मंदिराच्या उभारणीबद्दलही भाजपच्या आमदाराने प्रक्षोभक आणि वादग्रस्त विधान केले होते.