नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे मुंडके कापणार्याला दहा कोटींचे बक्षीस देण्याची घोषणा करणारे भाजप नेते सूरजपाल अमू यांनी आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले आहे. पद्मावती सिनेमाला पाठिंबा दर्शविल्याने बॅनर्जी यांचे शूर्पणखेप्रमाणे नाक कापण्याची धमकी अमू यांनी दिली आहे. पद्मावती चित्रपटातील कलाकारांना व समर्थकांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्याचे प्रकार भाजप नेत्यांकडून सर्रास सुरु आहेत.
काही महिला राक्षसी प्रवृत्तीच्या
वादग्रस्त विधान करणारे भाजप नेते सूरजपाल अमू म्हणाले, राक्षसी प्रवृत्तीच्या काही महिला असतात. ज्यामध्ये रावणाची बहिण शूर्पणखा होती. शूर्पणखाचे नाक कापून लक्ष्मणाने तिला धडा शिकवला होता. ममताजींनी ही गोष्ट विसरु नये. पद्मावतीचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि त्यांच्या चमूचे पश्चिम बंगालमध्ये स्वागत केले जाईल आणि या चित्रपटाच्या प्रीमियर आणि प्रदर्शनासाठी विशेष व्यवस्था केली जाईल, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते.
पद्मावतीचे पश्चिम बंगालमध्ये स्वागत
या चित्रपटावरून निर्माण झालेला वाद म्हणजे देशातील विचारस्वातंत्र्य नष्ट करण्याची सुनियोजित योजना आहे. भन्साळी आणि त्यांचा चमू पद्मावती चित्रपट अन्य कोणत्याही राज्यांत प्रदर्शित करू शकले नाहीत तर आम्ही त्यासाठी पश्चिम बंगालमध्ये विशेष व्यवस्था करू. बंगालला त्याचा अभिमान आणि आनंदच वाटेल, भन्साळी आणि त्यांच्या चमूचे आमच्या राज्यात स्वागत आहे. पद्मावतीचा वाद केवळ दुर्दैवीच नाही तर विचारस्वातंत्र्याची गळचेपी करण्याची एका राजकीय पक्षाची सुनियोजित योजना आहे. आम्ही या महाआणीबाणीचा निषेध करतो, असे बॅनर्जी यांनी ट्विट केले होते.