ममता बॅनर्जींना धक्का; विश्वासू आयपीएस अधिकार्‍यांची बदली

0

कोलकाताः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे विश्वासू आणि जवळचे समजल्या जाणार्‍या आयपीएस अधिकार्‍यांच्या निवडणूक आयोगाने शुक्रवारी तडकाफडकी बदल्या केल्या. यामुळे ममतांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पश्चिम बंगालमध्ये सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग केला जाऊ शकतो अशा भाजपाच्या तक्रारीवरुन निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, सीबीआयविरोधात धरणे आंदोलनाला बसलेल्या ममतांसोबत दिसलेले कोलकात्याचे पोलीस आयुक्त अनुज शर्मा यांचीही बदली करण्यात आली आहे. या प्रकरणी आता राज्य सरकार आता कायदेशीर लढ्याबरोबरच इतर पर्यायांवर विचार करीत आहे.

अनुज शर्मा यांच्याबरोबरच निवडणूक आयोगाकडून आणखी तीन पोलीस अधिकार्‍यांची बदली करण्यात आली असून राज्य सरकारला तसे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत त्यांना निवडणूकीच्या कामात समावून घेतले जाऊ नये. पश्चिम बंगालचे मुख्य सचिव मलय डे यांच्या नावे काढलेल्या आदेशात निवडणूक आयोगाने हा बदल्यांचा आदेश तत्काळ स्वरुपात लागू करण्यात आल्याचे म्हटले आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते मुकुल रॉय यांनी कोलकाता आणि बिधानगरच्या पोलीस आयुक्तांविरोधात अनुक्रमे अनुज शर्मा आणि शाम सिंह यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. संपूर्ण पश्चिम बंगालमध्येच हिंसाचाराची शक्यता व्यक्त करीत राज्याला अतिसंवेदनशील क्षेत्र घोषित करण्याची मागणीही त्यांनी केली होती.