नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निती आयोगाच्या पुनर्रचनेला काल मंजुरी दिल्यानंतर १५ जून रोजी निती आयोगाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून या बैठकीला हजेरी लावणार नसल्याचे कळवले आहे.
ममतांनी पंतप्रधानांना लिहीलेल्या पत्रात म्हटले की, निती आयोगाकडे कोणतीही आर्थिक ताकद नाही. त्याचबरोबर राज्यांनी तयार केलेल्या योजनांचे समर्थन करण्याची क्षमताही नाही. त्यामुळे माझ्यासाठी या बैठकीला हजेरी लावणे व्यर्थ आहे असे पत्र ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना लिहिले आहे. मोदी सरकारच्या मागच्या अशा बैठकांनापासूनही ममता दूर राहिल्या होत्या. यापूर्वीही ममतांनी नियोजन आयोग बरखास्त करुन त्याऐवजी नवा आयोग स्थापण्याच्या सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी सातत्याने राज्यांमध्ये एक आंतरराज्यीय समन्वय राखण्याऱ्या नव्या व्यवस्थेची मागणी केली आहे.