मयत महिलेच्या पंचनाम्यास पोलीस चौकीतील कर्मचार्‍यांकडून नकार

0

नातेवाईकांनी घेतली जिल्हापेठ पोलीस निरिक्षकांनी भेट ; मलकापूर स्थानकावर रेल्वेत चढतांना पाय घसरुन झाला होता मृत्यू

जळगाव- मलकापूर स्थानकावर रेल्वे चढत असतांना पाय घसरुन मेहरुण बी शेख ईस्माईल पिंजारी वय 50 रा. शिरसोली या महिलेला डोक्याला गंभीर दुखापत होवून तिचा मृत्यू झाल्याची घटना 26 रोजी घडली. मयताची नोंद होवून शवविच्छेदन व्हावे यासाठी कुटुंबियांनी विनवण्या केल्या. यानंतरही जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकातील जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍याने नकार दिल्यानंतर अखेर नातेवाईकांनी रात्री 12 वाजेच्या सुमारास थेट जिल्हापेठ पोलीस निरिक्षकांची भेट घेतली. निरिक्षकांने कर्मचार्‍यांना तंबी दिल्यावर मयताची नोंद घेवून पंचनामा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शिरसोली येथील मेहरुण बी शेख ईस्माईल पिंजारी हे खाजगी कामानिमित्ताने मलकापूर येथे गेल्या होत्या. 26 रोजी पुन्हा शिरसोली येथे परतण्यासाठी त्या मलकापूर स्थानकावर आल्या. याठिकाणी अमरावती-सुरत एक्स्प्रेसमध्ये बसत असतांना पाय घसरुन त्या रेल्वे स्थानकावर खाली पडल्या. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत सोबतच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथून प्रकृती खालावल्याने बुलढाणा येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणाहून शिरसोली गावजवळ असल्याने नातेवाईकांनी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविले. जिल्हा रुग्णालयात पोहचत असतांना वाटेतच मेहरुण बी यांची प्राणज्योत मालवली. रुग्णालयात पोहचल्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण पाटील यांनी मयत घोषित केले.

अन् कुटुंबिय जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धडकले
डॉ. प्रविण पाटील यांनी मयत महिलेच्या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलीस चौकीत पोलीस हवालदार शिवाजी पवार कार्यरत होते. मयत महिलेच्या कुटुंबियांनी भेट घेतल्यावर पवार यांनी त्यांना मलकापूर रेल्वे स्थानकावरील घटना असून आम्हाला रेल्वे विभागाची एमएलसी मिळालेली नाही, त्यामुळे पंचनामा करता येणार नाही, असे सांगितले. तसेच महिलेचा जिल्हा रुग्णालयात नव्हे तर वाटेतच मृत्यू झाला असल्याचे कारण देवून नकार दिला. कुटुंबियांनी रात्री 12 वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरिक्षकांनी भेट घेतली व त्यांना प्रकार कथन केला. यानंतर पोलीस निरिक्षकांची सांगण्यावरुन शिवाजी पवार तसेच पोली नाईक दिलीप पाटील यांनी पंचनामा केला. मंगळवारी सकाळी शवविच्छेदन करुन सकाळी 9 वाजेच्या सुमारास मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.

पोस्टाने पाठविली अकस्मात मृत्यूची कागदपत्रे
घटना मलकापूर रेल्वे स्थानकावर घडली. मलकापूर रेल्वे स्थानक शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. त्यानुसार मयताची शून्य क्रमांकाने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली. यानंतर ती शेगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. पंचनाम्यासह, अकस्मात मृत्यूचे कागदपत्रे पोलीस नाईक दिलीप पाटील यांनी रजिस्टर पोस्टाने मंगळवारी दुपारी शेगाव पोलीस ठाण्याच्या पत्त्त्यावर पाठविल्याचेही सूत्रांनी सांगितले.