मराठमोळ्या तरुणाचा सहा महिन्यात तीन वेळा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका

0

डॉ.युवराज परदेशी(निवासी संपादक दै.जनशक्ती)

विद्याधर प्रभुदेसाई यांची नोव्हेंबरमध्ये युरोप इंडिया सेंटर फॉर बिझिनेस अ‍ॅण्ड इंडस्ट्री (ईआयसीबीआय)च्यावतीने 2020 वर्षात भारत व युकेमधील संबंधांना चालणा देणार्‍या 40 वर्षांखालील व्यक्तींमध्ये निवड झाली. त्याआधी ऑगस्ट महिन्यात विद्याधर यांना लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स (आरएसए) चे अनिवासी सहकारी म्हणून सन्मानित केले गेले. तर जुलैमध्ये अमेरिकेच्या क्लायमेट रियलिटी प्रोजेक्टच्या पुढाकाराने क्लायमेट रियलिटी लीडर म्हणून त्यांची निवड झाली. त्यांचा हा प्रवास आजच्या तरुणाईसाठी निश्‍चित प्रेरणादायी ठरणारा आहे.

मराठी माणसाने अटकेपार झेंडा रोवला आहे, असे आपण अभिमानाने म्हणतो परंतु या इतिहासाची पुर्नरावृत्ती झाली असून आपल्या एका मराठमोळ्या तरुणाने सातासमुद्रापार झेंडा फडकावला आहे. विद्याधर प्रभूदेसाई हे त्या तरुणाचे नाव! मूळ ठाणेकर असलेल्या विद्याधर यांनी गत सहा महिन्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या तीन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरले आहे. गेल्या महिन्यात अर्थात नोव्हेंबरमध्ये युरोप इंडिया सेंटर फॉर बिझिनेस अ‍ॅण्ड इंडस्ट्री (ईआयसीबीआय)च्यावतीने 2020 वर्षात भारत व यूकेमधील संबंधांना चालणा देणार्‍या 40 वर्षांखालील 40 व्यक्तींची निवड केली आहे. यात विद्याधर प्रभुदेसाई यांची निवड झाली आहे. यंदा युरोपमध्ये गेलेल्या 14 महिला व 26 पुरुषांची यात निवड करण्यात आली आहे. या यादीत ऑस्ट्रिया, बेल्जियम, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी, हंगेरी, भारत, आयर्लंड, इटली, लाटव्हिया, लिथुआनिया, लक्समबर्ग, पोलंड, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम या देशांतील तरुणाईचा समावेश आहे. त्याआधी ऑगस्ट महिन्यात विद्याधर यांना लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स (आरएसए)चे अनिवासी सहकारी म्हणून सन्मानित केले गेले.

आरएसए ही एक 260 वर्षांची ब्रिटिश संस्था आहे ज्यात सामाजिक कल्पनांना सामर्थ्यशाली करणे, व्यावहारिक संशोधन आणि 80 देशांतील 30 हजार साथीदारांचे जागतिक नेटवर्कद्वारे व्यावहारिक निराकरण शोधण्यासाठी वचनबद्ध आहे. चार्ल्स डिकन्स, बेंजामिन फ्रँकलिन, स्टीफन हॉकिंग, कार्ल मार्क्स आणि नेल्सन मंडेला यांचा सहभाग या संस्थेत राहिलेला आहे. तर जुलैमध्ये अमेरिकेच्या क्लायमेट रियलिटी प्रोजेक्टच्या पुढाकाराने क्लायमेट रियलिटी लीडर म्हणून त्यांची निवड झाली. त्यांनी यूएसएचे माजी उपाध्यक्ष आणि नोबेल पुरस्कार विजेते अल गोर यांचेकडून प्रशिक्षण घेतले आणि 10 हजारहून अधिक प्रभावी हवामान कार्यकर्त्यांच्या जागतिक नेटवर्कमध्ये सामील झाले. हे नेटवर्क समाजातील प्रत्येक स्तरावर त्वरित कृती प्रस्तावित करून हवामान संकटाच्या जागतिक निराकरणाला उत्तेजन देते.

10 लाख तरुणांना रोजगाराच्या संधी दिल्याने वर्ल्ड बँकेचा पुरस्कार
विद्याधर यांचे प्राथमिक शिक्षण ठाण्यात झाले. 12 वी नंतर बी.कॉम.ची पदवी घेतली. आतापुढे काय? असा नेहमीचा प्रश्‍न त्यांनाही सतावत होता. यावर ठोस उत्तर सापडत नसल्याने त्यांनी एका सीएकडे नोकरी सुरु केली. मात्र, अवघ्या काही महिन्यातच त्यांना त्या नोकरीचा कंटाळा आल्याने त्यांनी ती सोडली. इतरांकडे नोकरी करण्यापेक्षा आपण स्वत:चे व्यवसाय सुरु करायला हवा, असा विचार करत त्यांनी स्वत:ची एक छोटेखानी कंपनी सुरु केली. मात्र, काही दिवसातच तो प्रयोगदेखील फसला. तरीही निराश न होता मोठी झेप घेण्यासाठी एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. आता एमबीएची डिग्री हातात आली होती. त्यांचे इंग्रजीवर असलेले प्रभुत्व व चांगल्या पर्सालिटीमुळे त्यांना एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत नोकरीही मिळाली. आता सर्वकाही सुरळीत सुरु होते. पगारही चांगला होता. मात्र आपल्याला पारंपरिक वाटेवर न चालता काहीतरी वेगळे करायचे आहे, हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. पदवी मिळवल्यापासून नोकरी मिळवण्यापर्यंतच्या फ्लॅशबॅक डोळ्यासमोरुन सरासरा गेल्यानंतर त्यांना इतरांना नोकरी/रोजगार मिळविण्यासाठी आपण काहीतरी करु शकतो, याची जाणीव झाली. याचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांनी लीडकॅप व्हेंचर्स या स्टार्टअपची सुरुवात केली. येथे सहसंस्थापक म्हणून काम करतांना त्यांनी स्वत:साठी यशाचा नवा राजमार्ग उभारला ज्या मार्गावरुन इतरांनाही दिशा मिळाली.

आज लीडकॅप आशिया, आफ्रिका आणि युरोपमधील देशांसह अफगाणिस्तान, इराक, लिबिया, इराण, सौदी अरेबिया, युएई, कतार आणि युनायटेड नेशन्स, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, यासारख्या विकास संस्था सारख्या अनेक आंतरराष्ट्रीय सरकारांशी काम करते. तसेच जागतिक बँक आणि संयुक्त राष्ट्र संघात सर्वसमावेशक विकास सहकारी म्हणून कार्यरत आहे. लीडकॅप ट्रस्टच्या माध्यमातून 10 दशलक्षाहून अधिक तरुणांवर परिणाम झाल्याबद्दल युवा रोजगारावर जागतिक बँकेचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. ठाण्यातील तरूणांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी यांनी ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या ठाणे हब सुरू केले. ठाणेकरांच्या जीवनावर परिणाम करणारे प्रकल्प चालविण्याच्या उद्देशाने हे केंद्र ठाण्यातील डायनॅमिक आणि वैविध्यपूर्ण साधकांचे एक मजबूत जाळे तयार करते. हबचे प्रकल्प समुदायाच्या हवामान कृती, विविधता आणि समावेशन आणि शिक्षण आणि कौशल्य यांच्या एकूण परिणाम लक्ष्यांसह संरेखित केले आहेत. विद्याधर यांना आतापर्यंत विविध आंतरराष्ट्रीय संस्था, संघटनांनी गौरविले आहे. यात त्यांना युनायटेड नेशन्स, फोर्ड फाऊंडेशन आणि रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स, लंडन यांची फेलोशिपदेखील मिळालेली आहे. त्यांच्या या प्रवासाबद्दल ते म्हणतात की, मी कधीही कोणत्याही मोठ्या व्यक्तींशी स्वत:ची तुलना केली नाही किंवा करत नाही कारण असे लोक लाखांमधून एकदाच निर्माण होत असतात. यामुळे आपल्या आजूबाजूच्या लोकांशी स्वत:ची तुलना करत तो करु शकतो तर मी का नाही? असा प्रश्‍न मी स्वत:ला विचारत असतो.

कॉलेजमध्ये असतांना वर्ल्ड बँक, युनायटेड नेशन्स अशी नावे ऐकली होती. तेव्हाच ती ठरविले होते की, त्यांच्यासोबत काम करायचे, त्याकाळी योग्य मार्गदर्शन व योग्य दिशा न मिळाल्यामुळे सुरुवातीला अपेक्षित असे यश मिळाले नाही म्हणून आता मी अशी स्वप्ने पाहणार्‍या तरुणांना मार्गदर्शन व मदत करतो. आपल्या देशात युवावर्गाची मोठी ताकद आहे. परंतु आपण स्वस्तात मिळणार्‍या इंटरनेट डेटाच्या जाळ्यात अडकलो आहोत. यात युवापिढीचा खूप वेळ वाया जात असल्याने ते त्यांच्या लक्षापासून लवकर भरकटतात. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर याच इंटरनेटचा वापर ज्ञानासाठी व माहिती मिळवण्यासाठी करा, क्रिएटीव्हटी व इनोव्हेशनवर भर द्या, असा मोलाचा सल्लाही त्यांनी आजच्या तरुणाईला दिला आहे.