मराठमोळ्या दिग्दर्शकाचा ‘न्यूटन’ ऑस्करवारीला!

0

चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशीच मिळाले गिफ्ट

मुंबई : अमित मसुरकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाचा ‘न्यूटन’ हा चित्रपट आता ऑस्करच्या शर्यतीत उतरला आहे. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या या पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागासाठी भारताकडून ‘न्यूटन’ची निवड करण्यात आली. राजकुमार राव या अभिनेत्याने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून, शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समितीने ऑस्करसाठी ‘न्यूटन’ची अधिकृत निवड झाल्याचे जाहीर केले. समितीने 26 चित्रपटांतून एकमताने ‘न्यूटन’च्या नावावर शिक्कामोर्तब केले, असे समितीप्रमुख सी. व्ही. रेड्डी यांनी सांगितले. विशेष म्हणजे, शुक्रवारीच हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला, त्यामुळे एकप्रकारे प्रदर्शनाच्या दिवशीच सिनेमाला ऑस्करवारीचे गिफ्ट मिळाले आहे.

देशभरातील साडेतीनशे चित्रपटगृहांत एकाचवेळी प्रदर्शित
ऑस्करमध्ये पाठवण्यासाठी 26 चित्रपटांचा विचार झाला; पण त्यापैकी न्यूटनची एकमताने निवड करण्यात आली, अशी माहिती निवड समितीचे प्रमुख सी. व्ही. रेड्डी यांनी दिली. शुक्रवारीच जवळपास 350 चित्रपटगृहांत हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट समीक्षकांच्या आणि प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. अमित मसुरकरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, छत्तीसगडच्या नक्षलवादी परिसरात काम करणार्‍या एका कर्मचार्‍याची ही कहाणी आहे. यात राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. राजकुमारने यात न्यूटन कुमारची भूमिका साकारली आहे. आपल्या भूमिकेविषयी एका मुलाखतीत राजकुमार म्हणाला होता, की या चित्रपटात मी एका सामान्य नागरिकाचे प्रतिनिधित्व केले आहे. घनदाट जंगलामधील नक्षलवाद्यांची संघर्ष कथा प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. माझी भूमिका ही एका सामान्य नागरिकाची कहाणी सांगणारी आहे. शुक्रवारी ‘भूमी’, ‘न्यूटन’ आणि ‘हसिना पारकर : द क्वीन ऑफ मुंबई’ हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. प्रदर्शनाच्या दिवशीच न्यूटनची निवड झाल्याने राजकुमार रावने आनंद व्यक्त केला. न्यूटनची भारताकडून ऑस्करसाठी निवड झाल्याची माहिती स्वतः राजकुमार रावने ट्विटरवर दिली.

या सिनेमांसोबत ‘न्यूटन’चा होणार सामना
स्वीडनच्या ‘द स्क्वायर’, जर्मनीच्या ‘इन द फेड’, कंबोडियाच्या ‘फर्स्ट दे किल्ड माई फादर’, पाकिस्तानच्या ‘सावन’ सोबत ‘न्यूटन’चा सामना होणार आहे. 90व्या अकॅडमी अ‍ॅवॉर्डचे आयोजन 4 मार्च 2018ला लॉस अ‍ॅन्जोलिसमध्ये होणार आहे. सिने-समीक्षकांनी ‘न्यूटन’ सिनेमासाठी 4.5 पर्यंत रेटिंग दिली आहे.