मराठमोळ्या शोभायात्रांनी नववर्षाचे स्वागत

0

जळगाव । चैत्र पाडवा आणि हिंदू नववर्षाचे आज मंगळवारी हर्षोल्हासात शोभायात्रा काढून स्वागत करण्यात आले. यावेळी विविध संघटना व संस्थांकडून भव्य शोभायात्रा काढण्यात आल्या. तसेच शहरात चौकाचौकात रांगोळ्या काढून गुढी उभारण्यात आल्या होत्या. यासोबतच राष्ट्रीय स्वंयमसंघांतर्फे सकाळी पथसंचलन करण्यात आले. यातआबालवृद्ध सहभागी झालेले होते. तसेच ढोलताश्यांच्या गजरात हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सुवर्णनगरी जळगावचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिर संस्थानतर्फे यानिमित्त काढण्यात आलेल्या नववर्ष स्वागत यात्रेने जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले.या शोभायात्रेत विविध पंथ, संप्रदाय, सामाजिक संस्था, भजनी मंडळे, गणेश मंडळे यांचा समावेश होता. विसनजीनगरमधील पंचमुखी गायत्री मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झाली. याप्रसंगी शहरातील विविध मान्यवरांचे हस्ते गायत्री मातेची आरती करण्यात आली. यात श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती हभप मंगेश महराज जोशी, जळगाव पिपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, अनिल झंवर, गणेशोत्सव महामंडळाचे सचिन नारळे, मनोज पाटील, मुकुंद शर्मा, दीपक जोशी, विराज कावडीया, अमित जगताप, वृक्षाली देशपांडे, रेखा कुळकर्णी, शिवाजी भोईटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

गायत्री मातेच्या महाआरतीनंतर शोभायात्रेस सुरूवात झाली. ‘श्रीरामाचा जयघोष करीत शोभायात्रा निघाली. प्रारंभी भगवा ध्वजधारी त्यामागे प्रभू रामचंद्र व संत गजानन महाराज यांच्या पालखी, पाठोपाठ शेकडो कलशधारी महिला व युवती सहभागी झाल्या होत्या. तसेच भारतमाता, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, संत अप्पा महाराज आदींच्या प्रतिमा शोभायात्रेत होत्या. शोभायात्रेत जुन्या जळगाव परिसरातील गणेश मंडळातील लेझिम पथक सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात सहभागी युवकांनी शिस्तबध्द लेझिमची झलक दाखविली. लेझीम पथकांमध्ये युवतींचाही सहभाग होता. तर ठिक-ठिकाणी शंखनाद केला जात होता. हिंदु नववर्षाच्या शोभायात्रेने सूंपर्ण शहराच चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. वाहनांवर झाशीची राणी, प्रभु श्रीराम यांचे सजीव देखावे जळगावकरांचे लक्ष वेधून घेत होते. गायत्री मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात होवून दक्षिण मुखी हनुमान मंदिर, जयप्रकाश नारायण चौक, टॉवर चौक, रा.स्व.संघ कार्यालय, बळीराम मंदिर, सुभाष चौक, सराफ बाजार परिसरातून ही शोभायात्रा काढण्यात आली. या दरम्यान ठिकाठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. सहभागी अनेक महिलांनी फेटा बांधला होता व नऊवारी साडी परिधान केली होती.

‘पाडवा पहाट’ मैफिलीत श्रोते मंत्रमुग्ध
संस्कार भारतीतर्फे आयोजित महानगरपालिकेच्या प्रांगणात सुरेल मैफिलीच्या पाडवा पहाटने हिंदु नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. संस्कार भारतीच्या पाडवा पाहाट या सुरेल गीतांच्या मैफिलीत दुष्यंत जोशी, भागवत पाटील, सिका जोशी, श्रृती वैद्य, पुरुषोत्तम पाटील, हर्षदा कासार, अपेक्षा पाटील, दिव्या चौधरी, विशाखा जोशी, निळकंठ कासार, जगदीश गंगावणे, माधव पारगावकर, पल्लवी देशपांडे, केतकी व श्रावणी भालेराव, आसावरी जोशी, माधुरी जाधव, अनिता निवाणे, गौरी निमजे यांनी ‘विजयी पतका श्री रामाची, अबीर गुलाल उधळीत रंग, पैल तो गे काऊ’ यांनी सादर केलेल्या भक्तीगीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. निवेदन वैशाली पाटील यांनी केले. सिंथेसाइझरवर गिरीश मोघे, संवादिनीवर दिलीप चौधरी, ऑक्टोपॅड व ढोलकीवर शरद भालेराव तर तबल्यावर दर्शना व सारंग जेऊरकर यांनी साथसंगत केली. यशस्वीतेसाठी भुषण खैरनार, किशोर सुर्वे, चित्रा लाठी, रेखा लढे, संगीता फिंगळे, शारदा सावदेकर, गीता रावतोळे, शालिनी झांबरे यांनी परिश्रम घेतले. संस्कार भारतीतर्फे महानगरपालिकेच्या प्रांगणात सुवासिनींच्या हस्ते गुढीपूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते उगवत्या सुर्याला अर्घ्य वाहून गुढीच्या साक्षीने हिंदु नववर्षाचे स्वागत केले.

केशव स्मृती प्रतिष्ठानातर्फे शोभायात्रा
केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित सेवावस्ती विभागाच्या माध्यमातून हरिविठ्ठल नगर येथून श्रीधरनगर येथील दत्त मंदिरापर्यंत नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली होती. हिंदू परिवारात तुळस हा महत्वाचा अविभाज्य घटक आहे. प्रत्येक घर तुळस शिवाय अपूर्णच आहे. ही भावना लक्षात घेता उत्कृष्ट तुळस स्पर्धा घेण्यात आली. यात 32 महिला स्पर्धक सहभागी झाले होते. केशवस्मृती प्रतिष्ठान सेवावस्ती विभागाच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण आणि संस्कार या त्रिसूत्रीच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांपासून वस्ती भागात सेवा देत आहेत. हरिविठ्ठल नगर, राजीव गांधी वस्ती, खंडेराव नगर या भागात आरोग्य सेवा केंद्र, विद्यार्थी विकास केंद्र, पाठयपुस्तक सहयोग योजना या सारख्या उपक्रमांबरोबरच गेल्या वर्षांपासून नववर्ष स्वागत यात्रा घेवून एक नवीन पायंडा रुजविण्याचा प्रयत्न केशवस्मृती प्रतिष्ठान करीत आहे. यात जास्तीत जास्त लोकसहभाग झाला प्रवीण हिवराळे यांनी गुढीच्या मिरवणुकीसाठी बैलगाडी जाविण्याची जबाबदारी पार पाडली.

यात्रेत हरिकेशव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे भजन करण्यात आले. जिजामाता विद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे लेझीम पथक सहभागी होते. सोबत उद्यमी महिला पतसंस्थेच्या महिला बचत गटातील भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्कृष्ट तुळस स्पर्धेत सायली पाचपांडे आणि नीता राणे यांनी परीक्षण करून विजेत्यांची घोषणा केली.

यावेळी प्रथम पारितोषिक आशा गरुड यांना द्वितीय चंद्रभागा मराठे तर तृतीय पारितोषिक चमेला महाजन यांना मिळाले. बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिजामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र खोरखेडे, उद्यमी महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. मीनाताई जोशी तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी बळवंत नागरी सह. पतसंस्थेचे संचालक विनोद पाटील उपस्थित होते. यावेळी केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, सचिव रत्नाकर पाटील सेवावस्ती विभाग प्रमुख डॉ.विवेक जोशी, पियुष रावळ, स्वप्नील चौधरी, अमित पाठक, सचिन माळी, दिनेश ठाकरे, भानुदास येवलेकर, जितेंद्र शाह, विलास वाणी, सपना श्रीवास्तव स्नेहा नगरकर आणि केशवस्मृतीचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

स्वामी नरेंद्राचार्य भक्त परिवार
स्वामी नरेंद्राचार्य भक्त परिवार व शिष्य मंडळातर्फे नववर्षांच्या स्वागतानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी ही शोभायात्रा चिमुकले राम मंदिरापासून ते श्रीराम मंदिर संस्थानपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. यात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. मिरवणुकीच्या सुरुवातीला पारंपरिक वेशभुषा करीत मुलींनी लेझीमचे सादरीकरण केले. आदिवासी नृत्यात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. यावेळी भर उन्हात लेझीम खेळण्याचा जोश पहायला मिळत होता. तसेच ही शोभायात्रा लक्षवेधी ठरत होती. शोभायात्रेचे प्रमुख मान्यवर महापौर नितीन लड्ढा ,आमदार राजूमामा भोळे ,किशोर सूर्यवंशी नाभिक महामंडळ ,अनिल तापडिया ,कृषी उत्पन्न बाजार सामोरी सदस्य संतोष नारखेडे आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन करूंन शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली.

40 कलश धारी महिलांचा सहभाग
मिरवणुकी मध्ये मोठया प्रमाणात महिलांचा सहभाग लक्षणीय होता . फेटा आणि ध्वज आणि 40 कलशधारी महिला भक्त गण शोभायात्रेत सहभागी झाले होते. ’गणी गण गणात बोते ! असा जय घोष करीत शोभायात्रेत जल्लोष करण्यात येत होता. एकूण 400 महिला भक्तगणांनी आपला सहभाग नोंदवला आहे. आदिवासी नृत्य , शेतकरी आत्महत्या, स्त्री भ्रुण हत्या , श्रीराम राज्य अभिषेक ,वारकरी संप्रदाय या विविध पारंपरिक माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात आला . छत्रपती शिवाजी महाराज, जिजा माता , जेजुरीचे खंडेराव महाराज , झाशी राणी ,विठ्ठल रखुमाई अशा महापुरुष देवतांच्या वेशभूषा लहान बालकांनी शोभायात्रेत साकारल्या होत्या.