मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा केला सन्मान

0

आजच्या विद्यार्थ्यांनी केवळ गुणवंत न होता शिलवंत होणेही गरजेचे
संत साहित्याचे अभ्यासक बब्रुवान महाराज वाघ यांनी व्यक्त केले मत

पिंपळे गुरव- विद्यार्थ्यांनी केवळ गुणवंत न होता शिलवंत होणेही गरजेचे आहे. आपली ही जगातील सर्वांत उत्कृष्ट संस्कृती आहे. ही संस्कृती जपत चांगला अभ्यास करून नावलौकिक मिळवावा, असे आवाहन संत साहित्याचे अभ्यासक बब्रुवान महाराज वाघ यांनी विद्यार्थ्यांना केले. पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व फोल्डर फाईल देऊन गौरव करण्यात आला.

पालकांची उपस्थिती

यावेळी समाज प्रबोधनकार शारदा मुंडे, स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार, सूर्यकांत कुरुलकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्य आदिती निकम, सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश्‍वर आगलावे, हेमंत पाटील, संतोष आरगुलवाड, अजीज सिद्धीकी, संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य, भीष्माचार्य जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य, भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य आदींसह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माणुसकी नाहीशी होतेय
यावेळी वाघ महाराज पुढे म्हणाले की, एकीकडे विद्वान अभियंत्यांनी बनविलेल्या गगनचुंबी इमारतींची उंची वाढत असताना माणुसकी नाहीशी होत आहे. माणूस माणसाला विसरू लागला आहे. त्यामुळे आपण चुकीच्या गोष्टींसाठी आपण आग्रह धरतो आहोत. चुकीच्या गोष्टी आपण अंगीकारत आहोत. चुकीच्या संस्कारांमुळे विद्यार्थी मागे पडताना दिसत आहेत. त्यामुळे स्पर्धेच्या या युगात रस्सीखेच अथवा एकमेकांचे पाय न ओढता प्रत्येकाने खांद्याला खांदा लाऊन काम केले पाहिजे. प्रेमाने जग जिंगता येते, संतांच्या प्रेमाने देवालाही पृथ्वीवर पहावे लागले. अरुण पवार यांच्या बद्दल ते म्हणाले, की अरुण पवार हे खूप मोठ्या मनाचे आहेत. ते जे काही करतात, ते मनापासून व काहीही स्वार्थ न ठेवता करतात. त्यांनी ‘अरुण’ या शब्दाचा अर्थ सांगितला, अ – अथक अभ्यासू, रु – ऋण फेडणे, ण – नम्रता. अरुण पवार यांना वृक्षमित्र मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पालकांनी मित्राप्रमाणे वागावे
गोपाळ माळेकर म्हणाले की, पालकांनी विद्यार्थ्यांशी मित्राप्रमाणे वागावे. त्यांच्यांशी हितगुज करावे. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून नावलौकिक कमवावा. पालकांनी आपल्या इच्छा मुलांवर लादू नये. त्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि कुवतीनुसार अभ्यासक्रमाची निवड करू द्यावी. मुलांनीही आापल्या कौशल्याचा, आपल्या बुद्धीच्या कुवतीचा विचार करूनच अभ्यासक्रमाची निवड करावी. मग मात्र मुलांनी 100 टक्के आपले योगदान देऊन कष्ट केले पाहिजेत. मग यश नक्कीच मिळणार. शारदा मुंडे म्हणाल्या, मुलांनी चांगले संस्कार घेऊन मोठे व्हावे. सूर्यंकांत कुरूलकर यांनी प्रास्ताविक केले. दत्तात्रेय धोंडगे यांनी सूत्रसंचालन केले. तर वामन भरगांडे यांनी आभार मानले.