मराठवाडा भूषण पुरस्कार सोहळा येत्या रविवारी

0

पुणे । मराठवाडा समन्वय समितीतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मराठवाड्यातील सहा व्यक्तींना ‘मराठवाडा भूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. अशी माहिती समितीचे अध्यक्ष राजकुमार धरगुडे पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी समितीचे सचिव दत्ताजी मेहत्रे उपस्थित होते.

यामध्ये कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना शैक्षणिक पुरस्कार, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते यांना प्रशासकीय पुरस्कार, एक्सपोनेनशियल इंजिनिअर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश पेठे यांना उद्योजक पुरस्कार, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांना सामाजिक पुरस्कार, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांना कला-साहित्य पुरस्कार , तर जालना येथील प्रगतीशील शेतकरी ईश्वरदास घनघाव यांना कृषी पुरस्कार देण्यात येणार आहे.या पुरस्कार वितरणानंतर वैभवशाली मराठवाडा या विशेष अंकाचे प्रकाशन होणार आहे. पुरस्काराचे वितरण येत्या रविवारी (दि.17) सायं. 6 वा. बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात होणार आहे.