औरंगाबाद/पुणे : मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, परभणी आणि जालना आदी ठिकाणी शुक्रवारी रात्री पावसाचे पुनरागमन झाले. शनिवारी पहाटेसुद्धा मराठवाड्यासह मुंबई आणि विदर्भात पावसाने हजेरी लावली. पुणे शहरातही शनिवारी सकाळी पावसाच्या सरी पडल्या. तथापि, जिल्हा मात्र कोरडाच होता. पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाने तुरळ हजेरी लावली असली तरी, ग्रामीण भागात मात्र गरज असतानाही त्याने दडी मारली होती. रविवारीसुद्धा मराठवाडा, विदर्भात पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविलेला आहे.
शेतकर्यांना दिलासा
शुक्रवारी रात्रीपासून मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली. नागपुरात शुक्रवारी रात्री तीन तासांत 141.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर औरंगाबदमध्येही मुसळधार पाऊस झाला. गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बुलडाणा जिल्ह्यात शनिवारी सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मागील अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता. मराठवाडा, विदर्भातील स्थिती तर चिंताजनक होऊ लागली होती. पिके करपू लागल्याने शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही वाढू लागले आहे. अशातच पावसाने हजेरी लावल्याने सध्यातरी थोडाफार दिलासा मिळाला आहे.
जोरदार पावसाची शक्यता
आज 20 ऑगस्टरोजी कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. उद्या 21 ऑगस्टरोजी उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण-गोव्यात व उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक दठकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.