मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता

0

पुणे : अक्षय्य तृतियेच्या पूर्वसंध्येला पुणे परिसरात दुपारनंतर काही काळ ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. पुढील दोन दिवस परिसरात असेच वातावरण राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पारा अद्यापही 40 वरच आहे.

राज्यात गेल्या महिनाभरात कडक उन्हाळ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अक्षय्य तृतियेच्या सुमारास बिगरमोसमी पास होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. त्यानुसार शहर परिसरात दुपारनंतर काही काळ आकाशात ढगांनी गर्दी केल्याने आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, पाऊस झाला नाही. शहर परिसरात पुढील दोन दिवस ढगाळ हवामान राहील. त्यानंतर आकाश निरभ्र राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी रविवारी व सोमवारी पावसाच्या सरी पडतील, असेही वेधशाळेतून सांगण्यात आले. मुंबईसह कोकणात आकाश निरभ्र राहील, असेही सांगण्यात आले.