मराठवाडा साहित्य परिषदेचे पाच पुरस्कार जाहीर

0

औरंगाबाद । मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी दिल्या जाणार्‍या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदापासून बी. रघुनाथ यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा साहित्य परिषदेने निर्णय घेतला असून पहिला बी. रघुनाथ वाड्ःमय पुरस्कार प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीला जाहीर झाला आहे.

मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी उत्कृष्ट ग्रंथांना पुरस्कार दिले जातात. येत्या 29 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद येथे प्रसिद्ध साहित्यिक डॉ. गो.मा.पवार यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. मराठवाड्यातील लेखक व कवींना दिला जाणारा नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार केशव वसेकर यांच्या पाऊलवाट’ या ग्रंथाला दिला जाणार आहे. प्राचार्य म. भि. चिटणीस वाङ्मय पुरस्कार पुणे येथील डॉ. विलास खोले यांच्या विलोकन’ ग्रंथाला जाहीर झाला. मराठीतील समीक्षा व वैचारिक लेखनासाठी हा पुरस्कार दिला जातो. मराठीतील उत्कृष्ट कविता लेखनासाठी दिला जाणारा कै. कुसुमताई देशमुख काव्य पुरस्कार औरंगाबाद येथील कवी ना. तु. पोघे यांच्या ’बिनचेहर्‍यांचे अभंग’ या कवितासंग्रहाला देण्यात येणार आहे.