मराठवाड्याच्या विकासासाठी पंकजांना साथ देऊ पण…

0

धनंजय मुंडेंकडून पंकजांना सरकारशी भांडण्यांचे आवाहन

पुणे : मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद येथील नियोजित आयआयएमसारखी शैक्षणीक संस्था नागपुरला नेली. तशी संस्था मराठवाड्यात आणण्यासाठी तसेच ऊसतोड कामगारांचे प्रश्‍न, मराठवाड्याचा पाणीप्रश्‍न, यासाठी पंकजा मंडे सरकारशी भांडत असतील तर त्यांच्या सोबत एकत्र काम करण्यास हरकत नाही, असे शाब्दिक टोला विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना लगावला.

ऊसतोड कामगारांचे प्रश्‍न माहीत नाहीत
मराठवाडा प्रोफेशनल क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चहापान व थेट संवाद या कार्यक्रमात शुक्रवारी मुंंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद शाधला. यावेळी अ‍ॅड. विशाल कदम, विठ्ठल कदम, बालाजी फड, कुलदीप आंबेकर, मारूती अवरगंड आदी उपस्थित होते. धनंजय मुंडे म्हणाले, मराठवाड्यात पाण्याबरोबरच उसतोड मजुरांचा प्रश्‍न आहे. ऊसतोड कामगारांना दिल्या जाणार्‍या मजुरीत वाढ करण्यासाठी लवाद नेमला होता. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे कामगारांच्या तर माजी कृषीमंत्री खा. शरद पवार कारखान्यांच्या बाजूने बाजू मांडत व कामगारांचे प्रश्‍न सोडवत. आता वारसाने पंकजा मुंडे लवादाच्या प्रमुख झाल्या आहेत. परंतु दुर्देवाने त्यांना ऊसतोड कामगारांचे प्रश्‍न माहीत नाहीत, अशी टिका धनंजय मुंडे यांनी केली.

मराठवाड्यात रेल्वेचे जाळे हवे
मराठवाड्याच्या विकासाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून सध्याच्या सरकारची मानसिकता ही केवळ विदर्भाचा विकास करणारी आहे, असेही ते म्हणाले. मराठवाड्याच्या प्रगतीसाठी औद्योगीक क्षेत्रातील विकास होणे गरजेचे आहे. मराठवाड्यात सध्या औरंगाबादजवळील वाळुंज व सेंद्रे याठिकाणीच एमआयडीसी आहे. ही दोन्ही गावे औरंगाबादला लागून आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे प्रकल्प हे फक्त औरंगाबाद जिल्ह्यातच न होता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातही झाले पाहिजेत. मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यामध्ये रेल्वेचे जाळे विस्तारले गेले पाहिजे. यासाठी आपण कायम पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी सांगीतले.

वसतिगृहाचा प्रश्‍न सोडवू
मंत्रिमंडळाची एक बैठक ही मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये व्हावी आणि या बैठकीमध्ये फक्त मराठवाड्याच्या विकासाची चर्चा व्हावी, यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांना वारंवार निवेदने दिली आहेत. मात्र, मुख्यमंत्री यावर निर्णय घेत नाहीत. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना पुण्यात राहण्याची व्यवस्था नाही, या प्रश्‍नावर उत्तर देताना मुंडे म्हणाले, फक्त मराठवाडाच नाही तर राज्यातील इतरही भागातून पुण्यात शिकण्यासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय व्हावी म्हणून सरकारी वसतिगृहाची सोय व्हावी यासाठी आपण येत्या नागपूर अधिवेशनात मागणी लावून धरणार आहोत.

भाजपाला खरा लाभार्थी सापडेना
राज्य सरकारने मी लाभार्थीच्या मोठ्या प्रमाणावर जाहिराती केल्या. परंतु राज्यभरात भारतीय जनता पक्षाने जाहिरात केलेले लाभार्थ्यांवर संशय व्यक्त होत आहे. पुरंदर याठिकाणी लाभार्थी म्हणून निवडलेल्या शेतकर्‍याला आघाडी सरकारच्या काळात लाभ झाला असल्याचे बोलले जाते. तसेच पुण्यातील रईसा शेख यांनादेखील आघाडी सरकारच्या काळात फायदा झाला आहे. त्यामुळे भाजपला खरा लाभार्थीच सापडत नसून हे या सरकारचे दुर्देव आहे, असा टोला मुंडे यांनी लगावला.