मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी १५ हजार कोटींहून अधिकचा निधी – मुख्यमंत्री

0

औरंगाबाद : मराठवाड्याला विकासाची भूक आहे आणि मागासलेपणापासून मुक्ती हवी आहे, असं भावनिक विधान हैदाराबाद मक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. राज्य सरकारने मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी आतापर्यंत १५ हजार कोटींहून अधिकचा निधी दिल्याचे फडणवीस यांनी सांगितलं. त्यासोबतच राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गातून सर्वांधिक विकास मराठवाड्याचा होणार असल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याच्या विकासावर आधारित ‘अग्रेसर मराठवाडा’ या पुस्तिकेचं प्रकाशन केलं.

 

शेती व सिंचनावर भर

मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष राज्य सरकारने भरून काढला असून अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत १५ हजार कोटींचा निधी दिला आहे. मराठवाड्याची वाटचाल दुष्काळमुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. राज्यातील एकूण शेततळ्यांपैकी ३५ टक्के शेततळी मराठवाड्यात बांधली गेली आहेत. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठं काम मराठवाड्यात झालं आहे. यातून ६० हजार हेक्टर क्षेत्राहून अधिकचं सिंचन मराठवाड्यात होऊ शकतं. याशिवाय मराठवाड्यात वॉटर ग्रीडद्वारे १४ प्रकल्पांचे पाणी उद्योग, सिंचन, शेती आणि पिण्यासाठी पुरण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

औद्योगिक विकासाला चालना

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होणार असून या महामार्गाच्या विकासातून औरंगाबाद आणि जालना हे दोन जिल्हे उद्योगांचं मॅग्नेट ठरणार आहे. तसंच उद्योगांना आकर्षित करण्यासाठी छत्तीसगडसह इतर शेजारी राज्यांपेक्षाही कमी दरात मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांना वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.