मराठा आंदोलकांची राज्यस्तरीय समिती स्थापन

0

पुणे : काही लोक मराठा क्रांती मोर्चाचे नाव वापरून राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या घोषणा करत आहेत. परंतु मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कुठलाही राजकीय पक्ष काढणार नसल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच यापुढील मराठा मोर्चाची दिशा ठरविण्यासाठी एक राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून ती समितीच मोर्चाचे सर्व निर्णय घेणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या परिषदेला शांताराम कुंजीर, राजेंद्र कोंढरे, हनुंत मोटे, रघुनाथ चित्रे, तुषार काकडे, अनिल ताडगे, दत्तात्रय गायकवाड, विजय काकडे, सचिन आडेकर आदी उपस्थित होते.

जिल्हा समन्वय समिती स्थापन

मराठा मोर्चाला कुठलेही नेतृत्व नसल्याने आंदोलकांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे मोर्चाच्या पुढील वाटचालीमध्ये एकवाक्यता असावी, तसेच आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी एक समिती असावी या हेतूने या समितीची स्थापना करण्यात आली आहे. यापुढे या राज्य समन्वय समितीने घेतलेला निर्णय हा अंतिम आणि बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर या बैठकीत जिल्हा समन्वय समिती सुद्धा स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा पातळीवर जिल्हा समन्वय समिती काम करणार आहे.

शासनाकडे पाठपुरावा

केवळ आंदोलनात सहभागी झाले म्हणून ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत, ते गुन्हे मागे घेण्याचे आश्‍वासन मुख्यंमंत्र्यांनी दिले होते. परंतु अद्याप हे गुन्हे मागे घेण्यात न आल्याने ते मागे घेण्यासाठी शेवटपर्यंत राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. तसेच आरक्षणाची मागणी ही न्यायप्रविष्ठ असल्याने तसेच मागासवर्गीय समितीला तिचा अहवाल तयार करण्यास लागणारा वेळ समितीला देण्याचे मान्य करण्यात आले आहे. तोपर्यंत इतर मागण्यांसाठी पाठपुरवठा करण्यात येणार आहे.