मराठा आंदोलनातील जमावाला पांगविताना पोलिसाचा मृत्यू

0

औरंगाबाद-औरंगाबादजवळील कायगाव टोका येथे बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. श्याम लक्ष्मण पाठगावकर (वय ५०) असे या कॉन्स्टेबलचे नाव असून ते दुसऱ्या जिल्ह्यातून बंदोबस्तासाठी कायगाव टोका येथे आले होते.

औरंगाबादजवळील कायगाव टोका येथे सोमवारी काकासाहेब शिंदे (वय २७) यांनी गोदावरी नदीच्या पात्रात उडी घेतली. यात शिंदे यांचा मृत्यू झाला. यानंतर गंगापूरसह राज्यभरातील मराठा संघटना आक्रमक झाल्या असून मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी प्रशासनाने शिंदे कुटुंबियांना मदत जाहीर केल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गंगापूरमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे.

कायगाव टोका येथे मंगळवारी दुपारी जमावाला पांगवताना एका पोलिसाचा ह्रदविकाराचा झटका आला. पोलीस कॉन्स्टेबलला तातडीने औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला.

औरंगाबादमधील परिस्थिती पाहता उस्मानाबादहून पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे. संबंधित कॉन्स्टेबलही याच तुकडीसह औरंगाबादला आले होते.