सांगली : मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारचे कायदेशीर प्रयत्न सुरू असून लवकरच हे आरक्षण मिळेल, अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या स्मारकाचे भूमिपूजन मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते.
मुनगंटीवार म्हणाले, धनगर समाज आरक्षण आणि मराठा समाज आरक्षण हे दोन्ही प्रश्न वेगवेगळे आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भातील अहवाल दडपण्याचा प्रश्नच येत नाही. सरकार प्रत्येक समाजाच्या मागे ठामपणे उभे आहे. धनगर समाज मागास आहे हे आधीच स्पष्ट झाले आहे. मराठा समाज मागास आहे हे मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावरून आता स्पष्ट झाले आहे. पुढे ते म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची आता गरज नाही. सरकार दोन्ही समाजांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या मागण्या लवकरच मान्य होतील. त्यात कोणतीही अडचण नाही असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.