मुंबई: मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठविण्याच्या मागणीसाठी राज्य सरकार आणि मराठा समाजातील विविध संघटना सुप्रीम कोर्टात प्रयत्न करत आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने स्थगिती उठविलेली नाही. आज २० जानेवारीपासून सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी होणार होती. परंतु आता ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य सरकारमी न्यायालयासमोर ही सुनावणी ऑनलाईन पद्धतीने न घेता प्रत्यक्षरित्या घेण्याची मागणी केली. दरम्यान, दोन आठवड्यांनी म्हणजेच ५ फेब्रुवारी रोजी न्यायालय आता यावर निर्णय देणार आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी पार पडणार होती. यापूर्वी २५ जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मराठा आरक्षणावरील सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे करण्यात येणार होती. परंतु आता ही सुनावणी तुर्तास पुढे ढकलण्यात आली आहे.
ऑनलाईन पद्धतीने संवाद साधने अवघड असल्याने प्रत्यक्षरित्या सुनावणी घेतली जावी, अशी विनंती राज्य सरकारचे वकिल मुकुल रोहतगी यांनी केली. यावर न्यायमूर्ती अशोक भूषण ‘२५ जानेवारीपासून या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही सुनावणी प्रत्यक्षरित्या सुनावणी करता येईल का नाही किंवा कोणत्या तारखेपासून करता येईल याबद्दल दोन आठवड्यांनी निर्णय घेण्यात येईल,’ असे सांगितले.