मराठा आरक्षण:लवकर निर्णय घ्या अन्यथा परिस्थिती बिघडेल 

0
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा सरकारला इशारा 
मुंबई – राज्यात मराठा आरक्षणासोबतच धनगर, मुस्लिम, कोळी, लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. सरकारने तात्काळ मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर करावा अन्यथा परिस्थिती बिघडू शकते असा गंभीर इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारला दिला. विधानभवनात सोमवारी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर  काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली होती.  त्या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना राज्यात परिस्थिती गंभीर बनली असून त्यासाठी सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी केली. राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात मराठा  आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीची आमदारांनी या बैठकीत माहिती दिली आणि त्यावर चिंता व्यक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील जनतेचा सरकारच्या विरोधात तीव्र संताप निर्माण झाला आहे, लोकांना या सरकारविषयी कोणताच विश्वास उरला नाही. यामुळे त्यांनी आता रस्त्यावर उतरून आरक्षणाची लढाई सुरू केली असून यात जे काही तरुण आत्महत्या करत आहेत आणि आंदोलनातून नुकसान होत आहे. त्यासाठी केवळ सरकार जबाबदार असल्याची टीका चव्हाण यांनी केली. मराठा आरक्षण देण्यासाठी कोणत्याही कायदेशीर अडचणी नाहीत, राज्यात आणि केंद्रात यांचे सरकार असल्याने ते सहज देता येऊ शकते, परंतु त्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याने राज्यात परिस्थिती स्फोटक बनली आहे. त्याचप्रमाणे या सरकारने  मराठासह धनगर, मुस्लिम, लिंगायत आदी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही असाच अर्धवट ठेवला असल्याने आम्ही राज्यपालांना आणि  मागासवर्गीय आयोगाला भेटणार आहोत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.  
काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्याबाबत संभ्रम 
दरम्यान काँग्रेसच्या बैठकीत आमदारांच्या एकगठ्ठा राजीनाम्याबाबत चर्चा झाली. बैठकीत काँग्रेसच्या सर्व आमदारांनी सरकारविरोधात राजीनामा अस्त्र उगारण्याचे नक्की केले असल्याची माहिती मिळाली आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव आणला जावा यासाठी हा निर्णय काँग्रेसने घेतला असून विधिमंडळ पक्ष बैठकीत सगळ्या आमदारांनी राजीनामे देण्याचा प्रस्ताव मांडला ज्याला सगळ्या आमदारांनी एकमुखाने होकार दिला असल्याचेही कळले आहे. मात्र आमदारांच्या भावना तीव्र असून राजीनामा देण्याबाबत निर्णय आणि निष्कर्ष झाला नसल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. याबाबत मतभेद असून सभागृहात सरकारला जाब विचारला पाहीजे असे ते म्हणाले.

राज्यपालांना भेटले शिष्टमंडळ 
मराठा, मुस्लिम, धनगर, महादेव कोळी, लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. राज्यपालांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात हस्तक्षेप करून राज्य सरकारला निर्णय घेण्यासाठी निर्देश द्यावेत अशी मागणी केली.