मुंबई – विधिमंडळ धिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुनच चर्चेला सुरूवात झाली. विधानसभा विरोधपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर ज्येष्ठ नेते आणि शेकाप आमदार गणपत देशमुख यांनीही मराठा आरक्षणाबाबत सरकारला जाब विचारला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी केवळ बाहेर घोषणा न करता, सभागृहात विधेयक आणावे, अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे.
”माननीय मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, असे वक्तव्य सभागृहाबाहेर केले. पण, आरक्षणाचा अहवाल आला असून तो ताबडतोब सभागृहात ठेवावा. सध्याच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जावे, अशी मागणी ज्येष्ठ नेते आमदार गणपत आबा देशमुख यांनी केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, पण घटनेशी सुसंगत हे आरक्षण द्यावं अशी सभागृहाची मागणी आहे. तसेच मराठा समाजासह धनगर समाजालाही आरक्षण द्यावे. धनगर समाजाची गेल्या अनेक दिवसांपासूनची ही मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी बारामतीला आल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण देणार असल्याची घोषणा केली होती. आता, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचाही अहवाल आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजालाही लवकरात लवकर आरक्षण द्यावे, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.