मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

0

मुंबई: राज्य सरकारच्या मराठा आरक्षण विधेयकावरील मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी १२ रोजी सुनावणी झाली. त्यानुसार मराठा आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नकार दिला आहे. मात्र, याप्रकरणी पुढील दोन आठवड्यात उत्तर देण्याचेही राज्य सरकारला बजावले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 27 जून रोजी मराठा आरक्षण वैध असल्याचे सांगत नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा केला होता. मात्र, मराठा आरक्षणाविरोधात डॉ. जयश्री पाटील यांच्यावतीने अॅड. डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. राजकीय फायद्यासाठी नियमबाह्य स्वरुपात दिलेले एसईबीसी प्रवर्गाचे आरक्षण रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली.

मा. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिल्याने राज्य शासनाच्या भूमिकेला बळ मिळाले आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर केलेल्या कार्यवाहीला यानिमित्ताने पाठिंबाच मिळाला आहे. आषाढी एकादशीच्या शुभदिनी आराध्य दैवत पांडुरंगाने दिलेला हा आशिर्वादच आहे, असे ट्विट महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त करुन आनंद व्यक्त केला आहे.