मुंबई – मराठा आरक्षण जाहीर होऊन एक आठवडा देखील उलटला नाही तोच या मुद्यावरून पुन्हा एकदा न्यायालयीन लढाईस सुरुवात झाली आहे. आज मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात धाव घेणाऱ्या जयश्री पाटील यांचे वकील अनुपस्थित राहिल्याने मराठा आरक्षणवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र दुपारी 3 वाजेपर्यंत याचिका सादर करण्याची परवानगी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिली आहे.
राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून १६ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. हे आरक्षण घटनाबाह्य असल्याचे सांगत याविरोधात न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मराठा आरक्षणाचा विषय आज न्यायालयात आल्यावर आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते हे अनुपस्थित होते. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केली आहे. सरकारने ५० टक्क्यापेक्षा अधिक आरक्षण देणे घटनाबाह्य असल्याचे सांगत सदावर्ते यांनी याचिका दाखल केली असून आरक्षण रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे.
मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यातच ही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या याचिकेवर आता न्यायालय काय निकाल देणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, आजच राज्य सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला संरक्षण मिळाले असून राज्य सरकारची बाजू ऐकून घेतल्याशिवाय न्यायालयाकडून या आरक्षणाला स्थगिती देता येणार नाही.