मराठा आरक्षणासाठी अधिवेशनात पडसाद

0
दोन्ही सभागृहात मुख्यमंत्र्यांनी केले निवेदन
मराठा उमेदवारांसाठी सरकारी पदभरतीमध्ये १६ टक्के जागा राहणार राखीव 
सत्ताधारी-विरोधकांचे एकमेकांवर आरोपांच्या फैरी
निलेश झालटे,नागपूर- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुन्हा आंदोलन सुरु झाल्याने आणि आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांना पंढपुरात येऊ देणार नाही असा इशारा दिल्यानंतर आरक्षणाच्या मुद्द्याचे पडसाद अधिवेशनात दोन्ही सभागृहात उमटले. मराठा युवकांनी आतापर्यंत शांततेत आंदोलने करून आरक्षणाची मागणी केली, मात्र आता त्यांचा संयम सुटला आहे. सरकार या बाबतीत वेळकाढूपणाचे धोरण बजावत असल्याचा आरोप करत लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावे अशी मागणी विरोधकांनी केली तर आरक्षणाच्या निर्णयाचा मुद्दा न्यायालयाच्या अखत्यारीत असून समाजाला आवश्यक त्या सर्व सोयी दिल्या असून आगामी मेघाभरतीसह अन्य भरतींमध्ये आरक्षणाचा निर्णय लागेस्तोवर मराठा समाजासाठी १६ टक्के जागा आरक्षित ठेवल्या जातील असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केले.
सरकारी भरतीमध्ये १६ टक्के जागा राखीव- मुख्यमंत्री
शासकीय नोकऱ्यांसाठी घोषित करण्यात आलेल्या राज्य सरकारच्या महाभर्तीमध्ये सोळा टक्के जागा मराठा समाजासाठी राखीव ठेवण्यात येतील, न्यायालयाचा आरक्षणासंदर्भात  निर्णय आल्यानंतर या जागा अनुशेष म्हणून भरण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही सभागृहात केली. आरक्षणासाठी मराठा समाजाने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही सभागृहात गोंधळ झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले कि, आगामी मेगाभरतीमध्ये १६ टक्के जागा ह्या मराठा आरक्षणाचा निर्णय होईस्तोवर बॅकलॉग म्हणून राखीव ठेवल्या जातील. याचसोबत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार भक्कमपणे न्यायालयात आपली बाजू मांडत आहे. न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे मागासवर्गीय आयोगाच्या शिफारसीशिवाय हे आरक्षण देता येणार नाही  यासाठी नेमण्यात आलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल  लवकरात लवकर न्यायालयात सादर करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी  सांगितले. मराठा आरक्षणाचा विषय हा आता राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही तो न्यायप्रविष्ट आहे असे  मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक 
विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेसाठी  स्थगन प्रस्तावाची मागणी केली. ते म्हणाले कि, मराठा आरक्षणावरून परळीला सगळे तरुण एकत्र आले आहेत. लेखी आश्वासन मिळेपर्यंत हटणार नाही अशी तरुणांची भूमिका आहे. आरक्षणावरून सरकारचा वेळकाढूपणा करत आहे. सत्तेत येण्यापूर्वी आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मराठा समाजाच्या भावनेशी सरकार खेळत आहे. न्यायालयाचे नाव पुढे करुन सरकार वेळ काढत आहे, असा आरोप विखे पाटील यांनी केला. तर मराठा समाजातील तरुणवर्गाचा संयम संपतोय त्यामुळे वेळीच निर्णय घ्या अशी आग्रही मागणी विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी केली. पवार म्हणाले, मराठा समाजाने शांततेने मूक मोर्चे काढले त्यामुळे त्यांचे जगभर कौतुकही झाले परंतु आता या समाजातील तरुण वर्गाचा संयम सुटत आला आहे. एकादशीच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो त्यामुळे सरकारने मराठा आरक्षणाबाबत तात्काळ निर्णय घ्यावा  कोर्टानेही मराठा आरक्षणाबाबत भूमिका घ्या असे सरकारला सांगितले होते. त्यानंतर सरकारने सहा शासन निर्णय काढले आहेत मात्र त्यावर कोणतीच भूमिका घेतली गेली नाही असा आरोपही अजित पवार यांनी केला. विधानपरिषदेत धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षणासाठी परळीत 30 तासापासून ठिय्या आंदोलन सुरू आहे, बीड जिल्ह्यात आणि राज्याच्या तालुक्या तालुक्यात हे आंदोलन सुरू होत आहे, आंदोलनकर्ते हटायला तयार नाही. आंदोलनाचा वणवा पेटण्याआधी सरकारने आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशी मागणी मुंडे यांनी केली. भाजपा सरकारने कूटनीती तंत्राचा वापर करून गुजरातमधील पटेलांचे, हरियानातील जाटांचे आरक्षण संपवून टाकले, तोच प्रयोग मराठा आरक्षणाबाबत होतो. मागासवर्ग आयोगाचे काम कुठपर्यंत आले , किती दिवसात पूर्ण होणार आहे अशी विचारणा न्यायालयाला करावी लागत आहे याचा अर्थ सरकार वेळकाढुपणा करत आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.

 सरकारने बोगस नाही तर फोकस भूमिका घ्यावी 
आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना आमदार आशिष शेलार यांनी विरोधकांवर हल्ला चढवत आरक्षणासाठी सरकारने काँग्रेस-राष्ट्रवादीसारखी बोगस नव्हे तर फोकस भूमिका घ्यावी अशी मागणी केली. शेलार यांना विरोधकांनी बोलू देऊ नये अशी भूमिका घेतली त्यावेळी शेलार अधिक आक्रमक झाले.यावेळी शेलार म्हणाले, काँग्रेसने राणे समिती गठित करून केवळ अकरा दिवसांत माहिती अहवाल तयार करून आरक्षण दिल्याची घोषणा केली आणि मराठा समाजाला फसवले.  जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच होते तर त्यावेळच्या आघाडी सरकारने मागासवर्ग आयोगाचे गठन का केले नाही? बापट समितीचा अहवाल सदनासमोर का आणला नाही? आघाडी सरकारने इंद्रा सहानी केसचा निवाडा का विचारात घेतला नाही? उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आघाडी सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा अद्यादेश काढताना का विचारत घेतले नाहीत? असे सवाल करत  फोकस भूमिका या सरकारने घ्यावी अशी आग्रही भूमिका  शेलार यांनी मांडली
 धनगर आरक्षण अहवाल तयार
धनगरांना आरक्षण देण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूटकडून सर्वेक्षण पूर्ण केले आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल तयार आहे. तो कोणत्याही क्षणी प्राप्त होऊ शकतो. त्या अहवालानुसार आरक्षणासाठी केंद्राकडे शिफारस केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. सोबतच राज्यातील अल्पसंख्याकांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी सांगितले.  घटनेनुसार धर्माच्या आधारे आरक्षण देत येत नाही. पण मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी 50 टक्के शिक्षण शुल्क सवलत दिली आहे. अर्थसंकल्पात कधी नव्हे तेवढ्या निधीची तरतूद समाजासाठी केली आहे. त्यामुळे आम्ही पाठीराखे आणि तुम्ही असा आरोप लावू नका, असे मुख्यमंत्र्यांनी सदस्य अबू आझमी यांना खडसावले.