मराठा आरक्षणासाठी आता अर्धनग्न मोर्चा

0

पुणे । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता 10 मे रोजी पुण्यात अर्धनग्न मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच राज्यभर 10 ते 30 मे पर्यंत मराठा समाजाच्या बैठका व जाहीर सभा घेण्यात येणार असल्याची माहिती संभाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गोखले इन्स्टिट्युट पासून हा मोर्चा निघणार असून तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात येणार आहे. तर मुंबईत 30 मे रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईत आझाद मैदान ते मंत्रालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. मुख्यंमत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा ठराव पास करावा, अन्यथा आमरण उपोषण करू, तसेच आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईतून न हलण्याचा पवित्रा घेण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. हे आंदोलन एवढे दिवस शांततेत पार पडत होते. मात्र मागणी मान्य न झाल्यास उद्रेक होईल, त्याला सरकार जबाबदार राहील, असे त्यांनी सांगितले.

10 ते 30 मे दरम्यान होणार्‍या जाहीर सभा व बैठकींमध्ये मराठा समाजाच्या आमदार, खासदारांना सामील करून घेतले जाणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. मात्र इतर समाजाचे आमदार व खासदार यावेळी उपस्थित राहीले तर त्यांचे स्वागत करण्यात येईल, असेही पाटील म्हणाले.

फूट पडल्याची चर्चा
संभाजी पाटील यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला मराठा समाजाच्या मूक मोर्चाच्या आयोजकांपैकी कोणीही उपस्थित नव्हते त्यामुळे मराठा मोर्चा आयोजन समितीत फूट पडल्याचे बोलले जात आहे.

कोल्हापुरात दुसरी गोलमेज परिषद
कोल्हापुरात सकल मराठा समाजाची दुसरी गोलमेज परिषद 19 एप्रिलला होणार आहे. 400 हून अधिक लोक यात सहभागी होणार असून, समाजाचे नेतृत्त्व करण्यासाठी 25 जणांची कमिटी परिषदेत नियुक्त करण्यात येणार आहे.