मराठा आरक्षणासाठी बलिदान देणार्या स्व.काकासाहेब शिंदे व स्व.किशोरी काकडे यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात
81 गावातून निघाली मदत निधी यात्रा ; ‘आर्थिक मदत यात्रा’ नव्हे एक चळवळ
मुक्ताईनगर- राज्यभर मराठा आरक्षणासाठी उसळलेल्या मराठा क्रांती आंदोलन काळात सरकार आंदोलनाची काहीच दखल घेत नसल्याने पाहुन दोघांनी केलेल्या आत्मबलिदानाने समाजावर त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची हुरहुर मुक्ताईनगर तालुक्यातील मराठा समाजबांधवांना लागली. यातूनच 23 ऑगस्ट 2018 पासून सुरू झालेली मुक्ताईनगर ग्रामीण मराठा हुतात्मा काकासाहेब शिंदे मदत निधी यात्रा व या मदत फेरीतून औरंगाबाद येथे दोघा हुतात्म्यांच्या परीवाराच्या स्वाधीन गोळा झालेला निधी सुपूर्द करण्यात आला. हुतात्मा काकासाहेब शिंदे व हुतात्मा किशोरी बबन काकडे यांनी फुलासारखे आयुष्य केवळ समाज भावनेत वाहत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांचे बहुमूल्य आयुष्याचे बलिदान दिले. अतिशय हालाकीच्या परीस्थितीत या दोघांनी जर समाज भावना दाखविली तर आपणही त्यांच्यासाठी काहीतरी करावे. या उदात्त प्रेरणेने मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील तरुणांनी पुढाकार घेत पुर्ण तालुक्यातील मराठा समाजातील घरा-घरातून फुल न फुलाची पाकळी मदत गोळा करायची असे ठरविले त्यामुळे ही फक्त एक यात्रा नसून किंवा सर्वांनी मिळून केलेली एक आर्थिक मदत नसून ही यात्रा एक चळवळ आहे. मराठा समाज्याच्या ऐक्याचे प्रतीक आहे, असे ब्रीद तयार झाले.
81 गावातून जमा झाला मदतनिधी
पाहता-पाहता या मदतीला संपूर्ण तालुक्याभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. गावा गावामध्ये लहान-थोर मंडळी तसेच महिला व तरुणींनी व नागरीकांनी मोठ्या प्रमाणामध्ये मदत दिली. या यात्रेसाठी उचंदे, खामखेडा, शेमळदा, पुर्नाड, धामनदे परीसरातील तरुणांनी दोन महिने सलग तालुक्यातील प्रत्येक 81 गावांमध्ये जाऊन मदत निधी गोळा करण्यासाठी सहभाग नोंदवला. तालुक्यातील प्रत्येक गावांमधील मराठा तरुणांनी यात्रेसाठी मदतनिधी गोळा करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. या यात्रेसाठी फक्त मराठा समाजच नव्हे तर इतर जाती-धर्मातील लोकांनीदेखील मदतीचा हाथ पुढे केला. 3 नोव्हेंबर रोजी जमा झालेला निधीपैकी एक लाख अकरा हजार रुपये हुतात्मा काका साहेब शिंदे (कानडगाव, ता.गंगापूर) यांचे वडील दत्तात्रय रामदास शिंदे व आई मीराबाई दत्तात्रय शिंदे यांच्या स्वाधीन करण्यात आला तसेच उर्वरीत एक्कावन हजार रुपये शिवकन्या हुतात्मा किशोरी बबन काकडे (कपूरवाडी, ता.जि. अहमदनगर) ह्यांचे वडील बबन काकडे यांच्या स्वाधीन करण्यात आला.