औरंगाबाद: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण राज्यात आंदोलन करणारे विनोद पाटील यांना शिवसेनेने पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. आज युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि विनोद पाटील यांच्यात अर्धातास चर्चा झाली यात आदित्य ठाकरे यांनी विनोद पाटील यांना पक्षात येण्याची ऑफर दिली.
जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे औरंगाबादेत आले होते. हडकोतील ताठे मंगल कार्यालयात यात्रेच्या निमित्ताने ते नागरिकांशी संवाद साधणार होते. त्यांचा मुक्काम हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये होता. हॉटेलमधून ताठे मंगल कार्यालयाकडे जाताना विनोद पाटील यांच्या घरी गेले. यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे होते. विनोद पाटील यांच्यासोबत अभिजीत देशमुख होते. सुरुवातीला पाच-सात मिनीटे आदित्य ठाकरे यांनी सर्वांसोबत पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांना बाहेर जाण्यास सांगितले. आदित्य आणि विनोद पाटील यांच्यात सुमारे २५ मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली.