मराठा आरक्षण: अमित शाह आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

0

मुंबई-राज्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या एल्गाराची दखल भाजपाच्या हायकमांडने घेतली असून यासंबंधी चर्चेसाठी भाजपाध्यक्ष अमित शाह हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाच्या राज्यातील खासदारांची आज संध्याकाळी ७ वाजता भेट घेणार आहेत. ही भेट निश्चित मानली जात आहे.

मराठा आरक्षणाबाबत निर्णयाला उशीर होत असल्याने राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज आक्रमक झाला आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी शासकीय पुजेला मुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये येऊ देणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुजेला जाणे टाळले होते. तसेच नुकत्याच झालेल्या सांगलीच्या महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेलाही त्यांना जाता आले नव्हते. मात्र, तरीही सांगली महापालिका निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळवले. या पार्श्वभूमीवर आज होणारी शाह आणि फडणवीस यांची भेट महत्वाची मानली जात आहे. मराठा आंदोलनाचा आगामी काळात उलट परिणाम होऊ नये, याबाबतची या भेटीत चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांकडून कळते.