मराठा आरक्षण: एटीआर सादर; दुपारी मांडला जाणार विधेयक

0

मुंबई- मराठा आरक्षण संदर्भात राज्याच्या विधिमंडळात आज कृती अहवाल (एटीआर)सादर करण्यात आला आहे. कृती अहवाल सादर केल्यानंतर दुपारी विधेयक मांडले जाणार आहे. कृती अहवालासोबत कायद्याची प्रतही देण्यात आली आहे. धनगर आरक्षणासंदर्भातही लवकरच पावले उचलली जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करून १६ टक्के आरक्षणाची तरतूद करणारे विधेयक राज्य विधिमंडळात आज सादर होणार आहे. यापूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील कृती अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. कृती अहवाल सादर केल्यानंतर विधानसभेतील सदस्यांनी अहवाल वाचनासाठी काही वेळ द्या, अशी विनंती केली. यानुसार दुपारी याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. चर्चेनंतर मराठा आरक्षणासंदर्भात विधेयक सादर केले जाणार आहे.

कृती अहवाल सादर केल्यानंतर धनगर आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. धनगर आरक्षणासंदर्भातही उपसमिती नेमली जाईल आणि त्यानंतर एटीआर सादर करुन धनगर आरक्षणाचा मुद्दा निकाली काढला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अहवालात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्यात आलेला नाही. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद योग्य ठरेल, असे या कृती अहवालात म्हटले आहे.