मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला गेल्या कित्येक वर्षानंतर अखेर यश आले असून मराठा आरक्षणाचा कायदा आजपासून राज्यात लागू करण्यात आला. मराठा आरक्षणाच्या विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यानंतर राज्य सरकारकडून राजपत्र जाहीर करण्यात आलं आहे. मराठा आरक्षण लागू करण्यासंदर्भात संवैधानिक आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आजपासून म्हणजेच १ डिसेंबर २०१९ पासून मराठा आरक्षण कायदा राज्यात लागू करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी आश्वासन केले पूर्ण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलनकांना १ डिसेंबरला जल्लोष करायला तयार रहा असे आश्वासन दिले होते. ते आश्वासन पूर्ण करत आजपासून राज्यामध्ये मराठा आरक्षण कायदा लागू करण्यात आला आहे. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. २९ नोव्हेंबरला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षण विधेयकाला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर काल राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी मराठा आरक्षण विधेयकावर स्वाक्षरी केली. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर आज राजपत्रात अधिसूचना काढण्यात आली. त्यानंतर मराठा आरक्षण कायदा राज्यभरात लागू करण्यात आला.