पुणे । राज्य मागासवर्गीय आयोगाची पहिली बैठक निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पुण्यात झाली. यात राज्य शासनाने राज्य मागासवर्गीय आयोगाला जे अहवाल आणि कागदपत्रे दिले, त्यावर चर्चा करण्यात आली.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य शासनाने उच्च न्यायालयात ज्या बाबी सादर केल्या आहेत. त्याच बाबी राज्य सरकारकडून राज्य मागासवर्गीय आयोगाला सादर करण्यात आल्या. याबाबी पडताळून पाहण्यासाठी आणि एक सर्वेक्षण करण्याचा निर्णय या 8 सदस्यीय आयोगाने घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सर्वेक्षणाचा आराखडा काय असेल, त्यावर बुधवारी प्राथमिक चर्चा झाली. या आधी राज्य मागासवर्गीय आयोगाने अनेकवेळा मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी फेटाळली आहे. मात्र यावेळी आयोगाने आरक्षणाच्या मागणी संदर्भात नव्या निकषांनुसार सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाची पुढची बैठक दि. 16 डिसेंबरला होणार आहे.