मराठा क्रांती मोर्चाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा – रामदास आठवले

0

मुंबई | मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये 16 टक्के आरक्षण देण्याच्या राज्यशासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे .मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी काढलेल्या 9 ऑगस्ट रोजीच्या क्रांती मोर्चाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असल्याचे रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज जाहीर केले. मराठा सह देशातील गुर्जर; जाट; लिंगायत ब्रह्मण आदी उच्च वर्णीय जातींतील आर्थिकदृष्ट्या मागासांना संसदेत कायदा करून 25 टक्के आरक्षण देण्यात यावे त्यासाठी राज्यघटनेत संशोधन करून आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांहून वाढवून 75 टक्क्यांपर्यंत करावी, अशी मागणी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या बैठकीत रामदास आठवले यांनी केली आहे. संसदेत आर्थिक दृष्ट्या मागासांना आरक्षण देण्याचा कायदा झाल्यास मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असे आठवले म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण मिळणे आवश्यक असल्याचे सांगून अनुसूचीत जाती जमाती; ओबीसी; भटके विमुक्त या कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र कॅटेगरीत आरक्षण मिळावे या मराठा अमाजाने घेतलेल्या भूमिकेचे आपण स्वागत करीत असून मराठा आरक्षणाच्या मागणीला आपण सुरुवाती पासूनच पाठिंबा दिला असल्याची आठवण रामदास आठवले यांनी करून दिली. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला राज्यातील दलितांचाही पाठिंबा आहे यामुळे राज्यात दलित मराठा यांच्यात सौहार्द सामाजिक ऐक्य वृद्धींगत होईल असा विश्वास ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.