मुंबई (जनशक्ति टीम )। मराठा क्रांती मूक मोर्चा मुंबई येथे 6 मार्च रोजी विधीमंंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत धडकणार आहे. मोर्चा आयोजकांच्या राज्यव्यापी बैठकीमध्ये 6 मार्च की 23 मार्च यावरून वडाळ्यातील बैठकीत घमासान झाले. मराठा मोर्चा लवकरात लवकर करण्याचा आग्रह संभाजी ब्रिगेडने धरला आहे. तर अन्य संघटनांनी एकत्रीतपणे 6 मार्च रोजी आयोजित केलेला महामोर्चा यशस्वी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे मराठा क्रांती मूक मोर्चाच्या आयोजनावरून आता राजकारण सुरू झाले आहे.
अनेक कारणांसाठी बदलली तारीख
काही राजकीय व्यक्तींनी मुंबई मराठा क्रांती (मूक) महामोर्चा 31 जानेवारी ही तारीख जाहीर केली होती. मात्र त्या काळातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा, माघी गणपती उत्सव, मुंबईतील आचारसंहिता, हायकोर्टाचे निर्देश अशा काही बाबी असल्याने बहुमताने ती तारीख रद्द करण्यात आली असल्याचे मराठा क्राती मोर्चाचे मुंबई आयोजक सांगत आहेत.
… तर बसू शकतो मोठा फटका
संयोजकांमध्ये आजही तारखेबाबत वाद असल्याने याचा फटका मुंबई मध्ये होणार्या चक्का जाम आणि महामोर्चाला बसू शकतो, असे सांगण्यात येत आहे. त्यात नरेंद्र पाटील हे महाराष्ट्र राज्यातील लाखो माथाडी कामगारांचे नेते असल्याने त्यांनी जर यातून काढता पाय घेतला तर आंदोलनावर निश्चित परिणाम दिसण्याची शक्यता आहे.
6 मार्चवर झालेय शिक्कामोर्तब
मराठा मोर्चा आयोजकांच्या राज्यव्यापी बैठकीत 6 मार्च 2017 रोजी महाराष्ट्रातून एक मराठा, कोटी मराठा हे घोष वाक्य घेऊन मुंबईमध्ये विराट मोर्चा काढायचा व आणि 31 जानेवारी रोजी अखंड महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा निर्णय 15 जानेवारीच्या घेण्यात आला आहे. या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून राज्यस्तरीय बैठकीला समन्वयक उपस्थित होते.
लवकर हवाय मोर्चा?
मराठा समाजाच्या समाजाचा मराठा क्रांती मोर्चातला सहभाग पहाता सर्वच राजकिय पक्षांना याचा लाभ उठवायचा आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकी अगोदर मुंबई येथे मोर्चा आयोजित करून त्याचा राजकिय लाभ मिळवण्यासाठी मुंबई येथिल मोर्चाची घाई करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. 23 मार्च ही मराठा समाजाचे क्रांतीसुर्य आण्णासाहेब पाटील यांची जयंती असते. त्यामुळे मराठा महासंघाला विरोध म्हणून 6 तारखेचा घाट घातला जात असल्याचे मराठा महासंघाचे म्हणणे आहे.