मराठा क्रांती महामोर्चाचे यशस्वी पाऊल

0

मराठा क्रांती महामोर्चा मुंबईत नुकताच काढण्यात आला. जवळपास 15 लाख लोकांचा समुदाय आपले हक्क व अधिकारांसाठी एकत्र जमला होता. आझाद मैदानातील मोर्चाचे शेवटचे टोक चेंबूरपर्यंत होते, एवढा मोठ्या स्वरूपातील मोर्चा मुंबईने यापूर्वी कधीच अनुभवला नाही. छत्रपती शिवाजी महाराज दैवत असलेल्या मराठा समाजाची आजची स्थिती आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल आहे. त्यातच कालानुरूप बदल होऊन पूर्वीचा संपन्न असलेला मराठा आज शेतीच्या वाटणीमुळे तसेच कोणताही पिढीजात धंदा नसल्यामुळे मागास राहिला आहे. राज्य सरकारने मराठा मोर्चा शिष्टमंडळाला दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे कार्यवाही केली, तर मराठा समाजाला न्याय मिळणार आहे. पंजाब व हरियाणा येथील राज्यातील जाट, खट्टर आदींना आरक्षण मिळते, तर मराठा समाजाला आरक्षण देताना महाराष्ट्र राज्य सरकारला आखडता हात का घ्यावा लागतो, हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. राज्य सरकारच्या मते, मराठा समाजाचे आरक्षण हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. राज्य सरकारने न्यायालयात वेळोवेळी मराठा समाजाला आरक्षण का द्यावे, हे मुद्दे व्यवस्थित व वेळेवर न्यायालयात मांडले तर मराठा आरक्षणाला लवकरच हिरवा सिग्नल मिळण्याची दाट शक्यता वाटते. राज्य सरकारने तात्पुरती घोषणा करून सर्वांच्या तोंडाला पाने पुसल्याचे दिसत आहे. परंतु, मराठा समाजाला लवकर आरक्षण मिळाले नाही, तर त्याचे राजकीय, सामाजिकदृष्ट्या प्रतिकूल परिणाम महाराष्ट्रावर होणार आहेत, हे मात्र नक्की! कोपर्डीमधील मराठा समाजाच्या एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष बलात्कारानंतर मराठा समाज अस्तित्वाबद्दल जागृत होऊ लागला. या क्रांती मोर्चाला कुणी नेता नाही, कुणी पुढारी नाहीत. परंतु, एकमेव शिस्तबद्ध असलेला, योग्य व्यवस्थापन असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे संघटन असे मराठा क्रांती मोर्चाबाबत म्हणता येईल. मुंबईतील 9 ऑगस्टच्या मोर्चात ही शिस्तबद्धता दिसून आली, त्याबद्दल मोर्चेकरांचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे. मराठा समाज कालानुरूप बदलत आहे. मराठा समाजात आता पूर्वीसारखी तीच परिस्थिती राहिलेली नाही. शेतीचे वाटप कुटुंबात होऊन प्रत्येकाच्या वाट्याला थोडीफार शेतजमीन आली आहे, तर बलुतेदारांप्रमाणे पारंपरिक धंदा नसल्यामुळे अनेकजणांची हयात गेली तसेच आरक्षण नसल्यामुळे ओपनमध्ये मराठा समाजातील विद्यार्थी हुशार असूनही त्यांना किमान संधी नोकर्‍यांत मिळत नाही, हे खरे वास्तव आहे. ओपनमध्ये असलेल्या मराठा समाजातील काही विद्यार्थ्यांची कौटुंबिक परिस्थिती एवढी हलाखीची आहे की, सर्व शिक्षणाचा खर्च त्यांचे पालक करू शकत नाही. यामुळे अनेक मुलांनी इच्छा असतानाही शिक्षण अर्धवट सोडले आहे, तर कुणी मोलमजुरी करून पोट भरण्याचे काम सुरू केले. खरे तर त्यावेळी मराठा समाजातील विविध पक्षांतील नेते आपापल्या मस्तीत सत्ता उपभोगीत होते. त्यामुळे मराठा समाजातील तळागाळातील वर्गाचा आवाज या त्यांच्याच समाजातील मस्तवाल नेत्यांपर्यंत पोहोचला नव्हता. या नेत्यांनीही आपल्या समाजातील एका वर्गाकडे पूर्णपणे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले होते. परंतु, मराठा क्रांती महामोर्चा स्थापन झाल्यापासून मराठा समाजाच्या वास्तवाला पुढे आणण्यात आले.
अशोक सुतार – 8600316798