मराठा क्रांती मोर्चाची आदर्श आचारसंहिता

0

जेंव्हापासून कळायला लागले तेव्हापासून बरेच मोर्चे बघितले, ऐकले. येत्या अमुक अमुक तारखेला ह्या संघटनेचा मोर्चा, तमुक तमुक तारखेला त्या संघटनेचा मोर्चा अशा बातम्या ऐकल्या की पोटात गोळाच येतो आणि आता काहीतरी अपरीत घडणार याची भीतीच वाटते. आपण बघितले आहे कि, बर्‍याच मोर्चांमध्ये एसटी बसेसचे नुकसान झालेले आहे, बर्‍याच वेळा मारामार्‍या झालेल्या आहेत व परिणामी पोलिसांना अश्रूधूर सोडणे, लाठीमार करणेस भाग पडलेले आहे. बर्‍याच मोर्चांमध्ये लोकांना शारीरिक हानी तसेच मृत्यूला पण सामोरे जावे लागलेले आहे.

मराठा क्रांती मोर्च्याची सुरुवात औरंगाबाद येथे झालेले होती व त्यानंतर महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात भागात जवळ जवळ 57 मोर्चे निघालेत, किरकोळ घटना वगळता बहुतांशी मोर्चे हे शांततेत आणि शिस्तीतच पार पडलेत. परंतु परवा 9 ऑगस्टला तर मराठा क्रांती मोर्च्याने भारताची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणार्‍या मुंबईत खरंतर इतिहासाचं घडविला. जवळ जवळ 15 लाख मराठे एकवटल्याचे एका दैनिकाने छापले होते व सारा परिसर भायखळा ते आझाद मैदान फक्त आणि फक्त एक मराठा लाख मराठ्यांनी भरलेला होता. हा दिवस खरेच सोनेरी अक्षराने लिहिला जावा अशाच पद्धतीचा होता, परिपूर्णपणे शांतता व शिस्तबद्ध, असा मोर्चा निघणे खरेच स्वप्नवत असतांना सामान्य माणसाला खरेच मनातून सुखावणारा व खूपच आश्चर्यकारक होता. मेळाव्याचे परिपूर्ण आखलेले योजना , सगळ्या शक्यता लक्षात घेऊन लोकांना केलेले शिस्तीचे आवाहन खरंच कौतुकास्पद होते. अश्या पद्धतीने मोर्चे खरंच निघू शकतात हे या मराठा क्रांती मोर्च्यानी सिद्ध केले आहे. या मोर्चाचा आदर्श अख्ख्या भारतीय जनतेने घेतला पाहिजे व यापुढे सामान्य जनतेला हानी पोहोचणार नाही, सरकारी इन्फ्रास्ट्रक्चरची मोडतोड होणार नाही, मोर्चे करांना कुठलेही जिवीत हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

मुंबईच्या मोर्च्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे एका औम्ब्युलन्सला क्षणार्धात करून दिलेला मोकळा रस्ता, प्रथमतःच असा प्रचंड मोर्चा असतांनाही पोलिसांना मिळालेला मोकळा श्वास, सामान्य जनतेचे जीवन विस्कळीत न होता कसलाही न झालेला त्रास, कोणत्याही राजकीय पक्षाला स्टेजवर न दिलेले स्थान, मागण्या मान्य झाल्याचे मिळालेल्या आश्वासनांनंतर शांततेत मनात चांगली भावना घेऊन मोर्चाचे झालेले विसर्जन. मोर्चे शांततेत व शिस्तीत कसे पार पडले असतील याचा अंदाज आपण खालील मुद्द्यांवरून बांधू शकतो.

1. सगळी योजना नीटनेटकी आखलेली, एखाद्या खाजगी कंपनीने राबविलेला शिस्तबद्ध कार्यक्रमच .
2. योजनेत सगळ्या बाबींचा केलेला विचार जसे कुठून कुठे व कसे जायचे, साधारण गर्दी किती होईल याचा अंदाज बांधायचा, आलेल्या मोर्चेकर्‍यांच्या वाहनांचा विचार करून पार्किंगची व्यवस्था, त्यांचे खाणेपिणेची व्यवस्था.
3. नेतृत्वात नसलेले हेवेदावे. अगदी मागच्या महिन्यातच शेतकरी संघटनेच्या मोर्चाचे काळातच कोण कसे नेतृत्व करणार यावरून झालेले पेच आपण पहिले आहेतच .
4. युवक, युवती व महिलांचा लक्षणीय सहभाग
5. युवतींच्या समूहाने केलेले नेतृत्व
6. प्रत्येकाला आपण काय आणि कश्यासाठी करतोय याची असलेली जाण
7. सगळ्यात महत्वाचे म्हणजे केलेलं नियोजन ठरल्या प्रमाणे पार पाडणे हे आपल्याला वाटते तितके सोपे नाही. एकवेळ योजना कोणीही बनवू शकतो पण ती पार पाडण्यासाठी संघटीत व शिस्तीत केलेले प्रयत्नच लागतात.
8. सकारात्मक मानसिकता
9. पूर्णपणे राजकारण विरहित मोर्चा

मराठा क्रांती मोर्चाला किती यश मिळाले हे येणारा काळच सांगेल कारण मुख्यमंत्र्यांनी आश्वासने दिलेली आहेत ते प्रत्यक्षात येईल तेंव्हा खर्‍या अर्थाने न्याय मिळाला असे म्हणता येईल त्यामुळे खरंच हा शेवटचा मोर्चा होता कि अजून मोर्चे काढावे लागतील हा एक विचार करायला लावणारा विषय आहे. परंतु या मोर्चाने देशात जो एक आदर्श घालून दिला आहे कि मोर्चा कसा असावा याला तोड नाही. भविष्यात मोर्चे कसे असावेत याचा मोर्चे काढणारे नक्कीच विचार करतील अशी आशा आहे व आम्हा मराठ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मनापासून अपेक्षा करतो कारण आगे बढनेवाला कभी किसीको बाधा नही पहुचाता और दुसरोंको बाधा पहुचानेवाला कभी आगे नही बढ सकता ।

– चंद्रशेखर गोसावी,
आयटी इंजिनीअर, बीएमसी सॉफ़्टवेअर्स, पुणे