मुंबई : मुंबईतील रस्ते मराठा क्रांती मोर्चातील ध्वजांनी भगवे झाले होते. इतक्या संख्येने लोक एकत्र येतात शांतपणे. कोणताही अनुचित प्रकार नाही. एखादा धार्मिक जमाव असता तर गुरूंची कृपा नाहीतर दैवी असंच वर्णन करून भलत्यांचेच वाढवलं असतं किंवा राजकीय मोर्चा असता तर पक्षनेत्याची भलामण झाली असती. काय कारण असेल हा मराठा महासागर मर्यादांमध्ये राहीला. कुणीच आततायीपणा केला नाही. या मागे होते १२ हजार मराठा स्वयंसेवक. हेच समन्वय साधीत होते. गेले १० दिवस मोर्चाचे व्यवस्थापन हाच त्यांचा ध्यास होता.
स्वयंसेवक वाढू लागले…
भायखळा ते आझाद मैदान हा सहा किलोमीटर मार्ग मोर्चासाठी ठरविण्यात आला होता. मुंबईसाठी ४० स्वयंसेवकांची समिती तयार करण्यात आली होती. त्यांनी नियंत्रण कक्ष केला. मोर्चाचा मार्ग त्यांनी आखला. सुरूवातीला ४०० जणच होते नंतर १२०० स्वयंसेवक झाले.
कमिट्यांची कामे
विरेन पवार सांगतात कंट्रोल रूममधून सोशल मिडियावर संदेश पाठविले जात होते. शासकीय यंत्रणेशी समन्वय साधला जात होता. मोर्चाची घोषणा दोन महिन्यांपूर्वी झाली होती. मुंबई कमिटीने १५ दिवसांपासून नियोजन आणि कृतीही केली. सुरूवातील संध्याकाळीच स्वयंसेवक जमायचे पण मोर्चाचा दिवस जवळ आल्यावर पूर्ण वेळ ते देऊ लागले. मुंबई कोअर कमिटीने १५ उपसमित्या नेमल्या आणि त्यांना कामे वाटून देण्यात आली. त्यात प्रसिद्धी, सभामंच, छपाई, अन्न, पाणी, परवानग्या काढणे, टॉयलेट सुविधा, आरोग्य आदी कामांचा समावेश होता.
खर्चाचे असे होते…
मुंबईबाहेरून येणाऱ्यांनी स्वतःची सोय स्वतःच करावी हे अपेक्षित होते. मुंबई पोर्ट ट्रस्टने त्यांच्या जागेत वाहने पार्क करण्याची परवानगी दिली. महापालिकेकडून फिरती शौचालये भाड्याने घेण्यात आली. या सर्वासाठी येणारा खर्च देणगीदार परस्पर सुविधा देणाऱ्यांकडे पोहोच करीत होते. आम्ही पैसे स्वीकारले नाहीत. मोर्चासाठी आलेला खर्च व जमा आम्ही पारदर्शकपणे सर्वांपुढे ठेवतो, अशी माहितीही विरेन पवार यांनी दिली.