मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी दुचाकी रॅली

0

पिंपरी-चिंचवड : येत्या बुधवारी (दि. 9) क्रांती दिनी मुंबई येथे ’मराठा क्रांती मूक मोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्चात लाखोंच्या संख्येने मराठा समाजबांधव सहभागी होणार आहेत. या मोर्चासाठी वातावरण निर्मिती व्हावी, म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी दुपारी तीनच्या सुमारास पिंपरी-चिंचवड शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये मराठा समाजबांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

अशी निघाली रॅली
पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवड शहरातही मराठा मोर्चाच्या वातावरण निर्मितीसाठी दुचाकी रॅली काढण्यात आली होती. ही रॅली निगडीतील भक्ती-शक्ती चौक, केएसबी चौक, लांडेवाडी, भोसरी, नाशिक फाटा, पिंपळे सौदागर, वाकड, डांगे चौक, रहाटणी, थेरगाव, चिंचवडगाव मार्गे पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीची सांगता झाली.

महिलांचाही रॅलीत सहभाग
महिलांनीदेखील या दुचाकी रॅलीत सहभाग नोंदवला होता. रॅलीतील तरूण रॅली मार्गक्रमण करत असताना, नागरिकांना मुंबई येथील मोर्चा संदर्भात माहिती देत होते. मुंबई येथील मोर्चास पोचण्यासाठी शहरातून विविध ठिकाणांहून सुविधा करण्यात आली आहे. यासंदर्भातदेखील नागरिकांना माहिती देण्यात आली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.